नवी दिल्ली- अविश्वास ठरावावर बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर थेट आरोप केले. राफेल विमान खरेदीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेऊन त्यात गैरव्यवहार केला असा स्पष्ट शब्दांमध्ये त्यांनी सरकारवर हल्ला चढविला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले.
राफेल विमानाच्या खरेदीमध्येही घोटाळा झाला असून, मोदी सरकारच्या काळात अचानक प्रत्येक विमानाची रक्कम 500 कोटीवरुन 1600 कोटी रुपये झाली. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी या विमानाची किंमत सांगण्यास नकार दिला. फ्रान्स आणि भारत यांच्यामध्ये झालेल्या करारामुळे माहिती देता येत नाही असे त्यांनी सांगितले होते. मात्र मी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटून याबाबत माहिती विचारली असता असा कोणताही करार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे निर्मला सीतारामन खोटे बोलल्या आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्र्यांवर केला. यावर संरक्षण मंत्री सीतारामन आणि भाजपाच्या खासदारांनी विरोध केला आणि आक्षेप घेतला.
राफेल घोटाळ्यातून एका विशिष्ट उद्योजकाला हजारो कोटींचा फायदा झाला, असा थेट आरोपही राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विशिष्ट उद्योजकाला का मदत केली हे स्पष्ट करावे असे आव्हानही त्यांनी दिले. राहुल गांधी यांच्या या आरोपामुळे सभागृहात एकच गोंधळाचे वातावरण तयार झाले. पंतप्रधान माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाहीत हे सगळ्या देशाने पाहिले आहे.
चीनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर बसून पंतप्रधान अहमदाबादमध्ये झोपाळ्यावर बसून झोके घेत होते तेव्हा चीनचे हजार सैनिक भारतात घुसले होते. चीनचे राष्ट्राध्य जिनपिंग परत गेले आणि डोकलाममध्ये त्यांनी सैनिक पाठवले. पुन्हा मोदी चीनमध्ये गेल्यावर डोकलाम मुद्दा सोडून चर्चा होणार असे जाहीर करुन त्यांनी चीनच्या मतानुसारच चर्चा चालवली असा आरोपही राहुल यांनी मोदीवर केला.