'रामभक्ती आमची मक्तेदारी नाही, राम-हनुमान भाजपचे नेते नाहीत'; उमा भारती स्पष्टच बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 09:30 AM2024-01-09T09:30:19+5:302024-01-09T09:33:31+5:30
२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे, यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.
अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवीर रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे, या सोहळ्याची देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गज व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहेत. यात विरोधी पक्षनेते,उद्योगपती आणि सेलिब्रिटींचाही सहभाग आहे. यावर आता भाजप नेत्या माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी भाष्य केले आहे.
'रामभक्तीवर आमची मक्तेदारी नाही पण प्रभू राम सर्वांचा आहे. मतपेढीचे राजकारण आणि जनाधार गमावण्याच्या मानसिकतेतून आणि भीतीतून बाहेर पडण्याचे आवाहनही उमा भारती यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना केले आहे.
एकाचवेळी १२०० चपात्या बनवल्या जाणार, अयोध्येत अन्न प्रसादासाठी अजमेरहून खास भेट!
एका मुलाखतीत बोलताना उमा भारती म्हणाल्या, "प्राण प्रतिष्ठेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण हा राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टचा निर्णय आहे. हा राजकीय कॉल नाही. रामभक्तीवर आमचा कोणताही कॉपीराइट नाही. भगवान राम आणि हनुमान जी भाजपचे नेते नसून ते आपला राष्ट्रीय अभिमान आहेत. कोणीही त्यांच्या मंदिराच्या अभिषेकात सहभागी होऊ शकतो आणि कोणालाही त्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते.
उमा भारती म्हणाल्या, "मी सर्व राजकारण्यांनाही सांगेन की, याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका. तुमच्या घरांमध्येही रामाचे फोटो आहेत. तुमच्या नावावरही राम असू शकतो. त्यामुळे तुम्ही त्यात सहभागी व्हा. तुम्हाला मतं मिळणार नाहीत याची भीती बाळगू नका. 'मी भाजपच्या लोकांनाही सांगेन की, या अहंकारातून बाहेर पडा, फक्त तुम्हीच रामाची पूजा करू शकता. मी विरोधकांनाही सांगेन - तुम्हाला तिथे बोलावले जाईल या भीतीपासून मुक्त व्हा. अहंकार किंवा भीतीपासून मुक्त राहून आपण सर्वांनी रामललाच्या अभिषेकात आनंदाने सहभागी झाले पाहिजे, असंही उमा भारती म्हणाल्या.
वयाच्या १२ व्या वर्षी आंदोलनात सहभाग
भाजप नेत्या उमा भारती यांनी वयाच्या १२व्या वर्षी अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात सहभाग घेतला होता. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिद पाडली जात असताना उमा भारती तिथे उपस्थित होत्या. यात आरोपी असलेल्या ३२ जणांमध्ये त्यांचाही सहभाग आहे. २०२० मध्ये या सर्वांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. गेल्या वर्षी अलाहाबाद उच्च न्यायालयानेही त्यांच्या निर्दोष सुटकेविरुद्ध केलेले अपील फेटाळले होते. १८ जानेवारीपासून अयोध्येतच मुक्काम करणार असल्याचे उमा भारती यांनी सांगितले.