६३ मून टेक्नॉलॉजी प्रकरण: पी. चिदंबरम यांच्याविरोधात पुरावे नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 04:35 AM2020-08-15T04:35:58+5:302020-08-15T04:36:13+5:30
सीबीआयची उच्च न्यायालयाला माहिती
मुंबई : ६३ मून टेक्नॉलॉजी प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम व अन्य दोन सनदी अधिकाऱ्यांविरोधात पुरावे सापडले नाहीत, अशी माहिती सीबीआयने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.
कंपनीने दाखल केलेली तक्रार आर्थिक व्यवहार विभागाच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांकडे पाठवली, अशी माहिती सीबीआयचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्या. साधना जाधव व न्या. एन. जे जमादार यांना दिली. ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि सनदी अधिकारी के. पी. कृष्णनन, रमेश अभिषेक यांच्याविरुद्ध कारवाईस सीबीआय विलंब करत असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. चिदंबरम हे अर्थमंत्री असताना कृष्णनन हे फॉरवर्ड मार्केट कमिशनचे अध्यक्ष होते तर रमेश अभिषेक हे अर्थ मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव होते.
पी. चिदंबरम, कृष्णनन आणि रमेश अभिषेक यांनी पदाचा गैरवापर करून कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान केल्याप्रकरणी कारवाई करावी, यासाठी २०१९ मध्ये सीबीआयकडे तक्रार नोंदविली होती.
सुनावणी तीन महिन्यांसाठी तहकूब
२५ फेब्रुवारी २०२० च्या पत्रात म्हटले आहे की, ही तक्रार नंतर सीबीआयकडे पुन्हा पाठवण्यात येईल. मात्र, तोपर्यंत सीबीआय तपास करू शकत नाही, असे सीबीआयने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी तीन महिन्यांसाठी तहकूब केली.