देवेगौडा पंतप्रधान असताना एकही हल्ला झाला नाही, मग आताच का?, कुमारस्वामी यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 04:53 AM2019-03-04T04:53:14+5:302019-03-04T04:53:33+5:30
एच.डी. देवेगौडा पंतप्रधान असताना देशावर कधीही दहशतवादी हल्ले झाले नाहीत.
बंगळुरू : एच.डी. देवेगौडा पंतप्रधान असताना देशावर कधीही दहशतवादी हल्ले झाले नाहीत. मग ते आताच का होत आहेत, असा सवाल कर्नाटकचे मुख्यमंत्री व देवेगौडा यांचे पुत्र एच.डी. कुमारस्वामी यांनी विचारला आहे.
म्हैैसूर येथे शुक्रवारी एका जाहीर सभेत ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरला जाताना अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था लागते. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागात उघड्या जीपमधून व सुरक्षेचा बडेजाव न माजविता एकच पंतप्रधान फिरले ते म्हणजे देवेगौडा. ही वस्तुस्थिती जनतेने कधीच विसरू नये. भारत व पाकिस्तानमध्ये सध्या विलक्षण तणाव निर्माण झाला असून, त्यातून भविष्यात नेमकी काय स्थिती उद्भवेल हे आताच सांगणे कठीण आहे.
कुमारस्वामी म्हणाले की, भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानवर हल्ला केल्याबद्दल भाजपाने देशभर तिरंगा ध्वज फडकावत जल्लोष केला. त्या पक्षाच्या अशा वागण्यामुळे तणाव आणखी वाढणार आहे. जणूकाही स्वत:च विमाने चालवून पाकिस्तानवर बॉम्बफेक केली, अशा थाटात भाजपाचे नेते व कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव सुरू होता. आपल्या स्वार्थी हेतूंसाठी देशाशी निगडित संवेदनशील गोष्टींचा भाजपा गैरवापर करीत आहे. (वृत्तसंस्था)
>व्हिडिओत फेरफार
आपण शुक्रवारी केलेल्या भाषणाची व्हिडिओ फीत फेरफार करून टिष्ट्वटरवर झळकविण्यात आली, असा आरोप कुमारस्वामी यांनी भाजपावर केला आहे. या भाषणाची संपूर्ण व्हिडिओ फीत कुमारस्वामींनी टिष्ट्वटरवर उपलब्ध करून दिली आहे. लष्कर नव्हे तर स्वत:च युद्धभूमीत लढले असावे, असा भाजपा नेत्यांचा आवेश आहे, असे मी माझ्या भाषणात म्हटले होते. त्यातील काही शब्द वगळून या भाषणाची व्हिडिओ फीत भाजपाने झळकविल्याचा आरोप कुमारस्वामींनी केला.