गुंटुर (आंध्र प्रदेश) - कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण फसरलेले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे लोक कुणाच्या मदतीला जायलाही घाबरत आहेत. दरम्यान, असाच प्रकार आंध्र प्रदेशमध्ये घडला आहे. आंध्र प्रदेशातील गुंटुर जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीलाही अशाच अनुभवाला सामोरे जावे लागले. अपघात झाल्यावर या युवकाच्या मदतीला कुणीही धावून आला नाही. अखेरीस स्वतः डॉक्टर असलेल्या महिला आमदाराने मदतीसाठी धाव घेत या जखमी व्यक्तीवर उपचार केले.
मिळालेल्या माहितीनुसार एक तरुण गुंटुर येथून आपल्या दुचाकीवरून पिडुगुराला येथे जात होता. दरम्यान, गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास त्याच्या दुचाकीला एका ट्रकने धडक दिली. या अपघातात सदर तरुण गंभीर जखमी झाला. दरम्यान, हा तरुण जखमी अवस्थेत बराच वेळ रस्त्यावर पडून होता. दरम्यान, कोरोनाच्या भीतीने या तरुणाची कुणी मदत केली नाही.
यादरम्यान, आंध्र प्रदेशच्या आमदार श्रीदेवी ह्या तिथून जात होत्या. त्यांनी या अपघातग्रस्त तरुणाला पाहिले. त्यानंतर आमदार महोदयांनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवला. त्यानंतर अपघाताबाबत पोलिसांना खबर दिली. तसेच जखमीवर त्वरित प्राथमिक उपचार केले.
श्रीदेवी ह्या आंध्र प्रदेशमधील ताडीकोंडा विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. त्याबरोबरच त्या डॉक्टरही आहेत. दरम्यान, कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने लोक जखमीची मदत करत नव्हते. मी केवळ त्या जखमीवर प्राथमिक उपचार केले. कोरोनाच्या भीतीने कुणाची मदत न करणे ही चांगली बाब नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.