नवी दिल्ली: भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या मुस्लिम आरक्षणाच्या मागणीवर जोरदार हल्ला चढवताना मुस्लिमांना निर्लज्ज म्हटलं आहे. ज्यांनी 800 वर्षे देशावर राज्य केलं ते जर स्वतःला मागासवर्गीय म्हणत असतील तर त्यांच्यासाठी शरमेची बाब आहे, असं ते म्हणाले. मुस्लिम समाज मागासवर्गीय नाही. त्यामुळे त्यांना आरक्षण देण्याचा प्रश्नच येत नाही असंही स्वामी म्हणाले.इंग्रजी न्यूज चॅनल टाइम्स नाऊवर स्वामी म्हणाले की, देशात ब्राम्हण गरीब आहेत, क्षत्रियदेखील गरीब आहेत. मात्र, ते कधी आरक्षणाची मागणी करत नाहीत. उलट मुस्लिम निर्लज्जाप्रमाणे आरक्षणाची मागणी करत आहेत. देशावर 800 वर्ष राज्य केल्यानंतर ते आता स्वतःला मागासवर्गीय म्हणण्याची मागणी करत आहेत. धार्मिक बाबीवरुन आपण कुठल्याही प्रकारे मागासपणा निश्चित करु शकत नाही. मात्र, ओवेसी जर खरोखर कोणत्या मागास व्यक्तीचे नाव सुचवत असतील, तर त्याला आम्ही शिष्यवृत्ती देऊ शकतो. तसेच त्या व्यक्तीला मदत देखील करु शकतो, असेही स्वामी यांनी म्हटले. याशिवाय स्वामी म्हणाले, ओवेसीने बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम यांच्याप्रमाणे विचार करायला हवा. काशीराम यांनी अनुसुचित जातींना आरक्षणाचा विचार करण्याऐवजी समाजाच्या ताकदीबद्दल विचार करण्याची शिकवण दिली होती.ओवेसी यांनी ट्वीट करून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा मुद्दा छेडला होता. गुजरात विधानसभा निवडणुकीआधी पाटीदार नेता हार्दिक पटेलने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काँग्रेसला समर्थन देण्याची घोषणा केल्यानंतर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हार्दिक पटेलच्या भूमिकेवर टीका करत मुस्लिमांच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला. 'काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्यासाठी तयार झाली आहे. पण मुस्लिमांना नाही, जे सामाजिक आणि शिक्षणाच्या बाबतीत अद्यापही मागासलेले आहेत'. असं ट्विट ओवेसी यांनी केलं होतं.
'मुस्लिम निर्लज्ज, 800 वर्षे राज्य करूनही स्वतःला मागासवर्गीय म्हणवतात' - सुब्रमण्यम स्वामी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 9:36 PM