देशात परदेशी विद्यार्थ्यांच्या माहितीची अचूक नोंद ठेवणारी नाही यंत्रणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 08:17 PM2020-01-25T20:17:59+5:302020-01-25T20:32:58+5:30
देशात नेमके किती परदेशी विद्यार्थी कोणत्या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत आहेत, याची अचूक माहिती उपलब्ध नाही..
पुणे : पुण्यासह देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या माहितीची अचुक नोंद ठेवणारी मध्यवर्ती यंत्रणाच सरकारकडे नाही. त्यामुळे देशात नेमके किती परदेशी विद्यार्थी कोणत्या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत आहेत, याची अचूक माहिती उपलब्ध नाही. केंद्र सरकारकडून ही माहिती संकलित करणारी यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती भारतीय सांस्कृतिक स्वातंत्र्यासंबंधी परिषदेच्या उप महामहासंचालक नम्रता कुमार यांनी दिली.
पुण्यात दि. २८ व २९ जानेवारी रोजी आयोजित ‘डेस्टिनेशन इंडिया’ या राष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने त्या पत्रकारांशी बोलत होत्या. देशामध्ये सध्या सुमारे ४७ हजार विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत आहेत. पण हा आकडा अचुक नाही. सध्या परदेशी विद्यार्थी देशात आल्यानंतर गृह मंत्रालयाकडे त्याची नोंद होते. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याने शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर ही माहिती विद्यापीठ अनुदान आयोगासह संबंधित नियामक संस्थेकडे संकलित जाते. पण अनेकदा काही विद्यार्थी अल्पमुदतीचे अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतात. त्याची नोंद होत नाही. त्यामुळे युजीसी, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजसह अन्य नियामक संस्था आणि गृह मंत्रालयाकडील विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये खुप अंतर असते. हा आकडा नेमका किती हे सध्या सांगणे कठीण असल्याचे सुत्रांनी सांगितले.
याविषयी बोलताना नम्रता कुमार म्हणाल्या, ‘देशात नेमके परदेशी विद्यार्थी किती आहेत, याची माहिती ठेवणारी मध्यवर्ती यंत्रणा नाही. परदेशी विद्यार्थी पारंपरिक अभ्यासक्रमांसह व्यावसायिक व अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतात. वैद्यकीय अभ्यासक्रमांसह अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांची माहिती एकत्रित होत नाही. त्यामुळे कोणत्या अभ्यासक्रमात किती विद्यार्थी शिकतात हे समजत नाही. ही यंत्रणा विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे.
परिषदेमध्ये या मुद्यावरही चर्चा होणार आहे.’ संख्या होतेय कमी दरम्यान, परदेशी विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात कमी होत असली तरी त्यामागे विविध कारणे आहेत. त्यादृष्टीने त्यांच्या अडचणी सोडविणे, आपल्या संस्कृतीशी त्यांना जोडणे, आकर्षण वाढविणे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
परदेशी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा बदलत असून संशोधनासाठी येथील संस्थांना प्राधान्य मिळत आहे. त्यासाठी आवश्यक दर्जेदार सुविधा, शिक्षकही आपल्याकडे उपलब्ध असल्याचे सिम्बायोसिस विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर यांनी नमुद केले.
-------------------------