CoronaVirus: कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होण्याच्या शक्यतेनं दिल्लीच्या सीमा सील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 02:22 AM2020-04-23T02:22:31+5:302020-04-23T02:23:58+5:30
कोरोनाशी सुरू असलेल्या मुकाबल्यामधील एक पाऊल म्हणून नोएडा व दिल्लीच्या सीमा पूर्णपणे सील
नवी दिल्ली : कोरोना साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होण्याची शक्यता असल्याने दिल्ली व नोएडा यांच्या सीमा पूर्णपणे सील करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेशातील गौतमबुद्धनगरचे जिल्हाधिकारी सुरेश एल. वाय. यांनी दिली.
त्यांनी या संदर्भात एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे, की कोरोनाशी सुरू असलेल्या मुकाबल्यामधील एक पाऊल म्हणून नोएडा व दिल्लीच्या सीमा पूर्णपणे सील केल्या आहेत. या घातक साथीचा आणखी प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून नागरिकांनी अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य सरकारांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सध्या नागरिकांनी महत्त्वाचे कारण नसल्यास घराबाहेर पडू नये. तसेच प्रत्येक ठिकाणी तोंडावर मास्क लावावा व डिस्टन्सिंगचे पालन करावे.
तीन मेनंतर काय होणार?
दिल्लीत कोरोनाचे २ हजारांपेक्षा अधिक ,तर उत्तर प्रदेशामध्ये सव्वा हजारापेक्षा अधिकरुग्ण आढळून आले आहेत. या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती आहे. लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक व खासगी वाहतूक सेवा स्थगित करण्यात आली असली तरी दिल्ली व नोएडामध्ये ये-जा करणाऱ्यांची संख्या खूप कमी करण्याकरिता त्यांच्या सीमा पूर्णपणे सील करण्याचा निर्णय आवश्यकहोता, असे सूत्रांनी सांगितले. लॉकडाऊनची मुदत ३ मेपर्यंत वाढविली असली तरी तोवर साथ आटोक्यात न आल्यास निर्बंधांना पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींचा विचार दिल्ली व उत्तर प्रदेशाने केला आहे.