ईशान्येकडील पूरस्थिती : 58 जिल्ह्यांना तडाखा, 85 जणांचा मृत्यू
By admin | Published: July 13, 2017 09:29 PM2017-07-13T21:29:59+5:302017-07-13T21:38:09+5:30
ईशान्येकडील आसाम, मणीपूर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. या राज्यातील जवळपास 58 जिल्ह्यांना पुराचा आणि भूस्खलनाचा तडाखा बसला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
गुवाहटी, दि. 13 - ईशान्येकडील आसाम, मणीपूर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. या राज्यातील जवळपास 58 जिल्ह्यांना पुराचा आणि भूस्खलनाचा तडाखा बसला आहे. यामध्ये आत्तापर्यंत 85 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास मंत्री जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी जितेंद्र सिंह म्हणाले की, आसाम, मणीपूर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यातील एकूण 58 जिल्ह्यांमध्ये पुरामुळे आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, आत्तापर्यंत जवळपास 85 लोकांचा यामध्ये मृत्यू झाल्या माहिती मिळाली आहे. आसामध्ये वीज पडून आणि पुरात बुडून मृत्यू झालेल्यांची संख्या 50 वर पोहचली आहे. तर, अरुणाच प्रदेशमध्ये मंगळवारी झालेल्या भूस्खलनात 14 जणांनी आपला जीव गमावला असल्याची माहिती यावेळी जितेंद्र सिंह यांनी दिली.
#WATCH MoS Home Kiren Rijiu conducted a survey of flood affected areas of Assam and Arunachal Pradesh pic.twitter.com/oR2zByWgTf
— ANI (@ANI_news) July 13, 2017
दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज आसाम आणि अरुणाचल प्रदेशात जाऊन पूरग्रस्त भागांची पाहणी केली. अरुणाचल प्रदेशातील पापुम परे जिल्ह्यात असलेल्या लापताप गावातील पावसामुळे भूस्खलन झाले. यात 14 लोकांचा मृत्यू झाला होता. त्याठिकाणी किरेन रिजिजू यांनी जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की, आम्ही पूरग्रस्त भागांची पाहणी केली असून प्राथमिक स्वरुपात परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच, त्यानुसार केंद्राकडून नुकसान भरपाई करण्यात येईल.
आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनीही बुधवारी पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आसाम आणि ईशान्येतील अन्य राज्यांमधील पूरस्थितीबाबत चिंता व्यक्त करत शक्य ती सर्व मदत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे.
राष्ट्रीय महामार्ग गेला वाहून...
अरुणाचल प्रदेशात झालेल्या जोरदार पावसात नहार्लगुन आणि ईटानगरदरम्यान राष्ट्रीय महामार्ग 415 चा मोठा भाग वाहून गेला आहे. सध्या युद्धपातळीवर या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. खबरदारी म्हणून काही ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. ईटानगर आणि नहार्लगुनला जोडणारा जुलांग रोडदेखील पावसात खचल्याने मोठे नुकसान झाले आहे.