मुंबई - दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, आज सुरू असलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान आंदोलक शेतकरीदिल्लीतील लाल किल्ल्यावर धडकले आहेत. तर अनेक ठिकाणी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला दोषी ठरवले आहे. सरकार याच दिवसाची वाट पाहत होती का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, सरकार याच दिवसाची वाट पाहत होती का. सरकारने शेवटपर्यंत लाखो शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले नाही. ही कुठल्या प्रकारची लोकशाही आमच्या देशात वाढत आहे. ही लोकशाही म्हणता येत नाही. काही औरच चालले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.संजय राऊत पुढच्या ट्विटमध्ये म्हणाले की, जर सरकारला वाटले असते तर हिंसा थांबवता आली असती. दिल्लीमध्ये जे सुरू आहे त्याचे समर्थन करता येणार नाही. कुणीही असो लाल किल्ला आणि तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही. मात्र वातावरण का बिघडले. सरकार शेतकरी विरोधी कायदे का रद्द करत नाही आहे. कुठले अदृश्य हात राजकारण करत आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.दरम्यान, प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी कायद्यांना विरोध करत असलेल्या शेतकरी आंदोलकांनी आज ट्रॅक्टर मोर्चा काढला. मात्र सुरुवातीलाच हे आंदोलन नियंत्रणाबाहेर गेले असून, आंदोलक शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत प्रवेश करत लाल किल्ल्यावर कब्जा केला आहे. तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला झेंडा फडकवला आहे.
"ही लोकशाही नाही, सरकार याच दिवसाची वाट पाहत होतं का?" संजय राऊतांचा घणाघात
By बाळकृष्ण परब | Published: January 26, 2021 3:13 PM