नवी दिल्ली- परराष्ट्र मंत्रालय लवकरच पासपोर्टच्या शेवटचं पानं वगळण्याची शक्यता आहे. पासपोर्टच्या शेवटच्या पानावरच धारकाचं नाव आणि पत्ता असतो. त्यामुळे येत्या काळात पासपोर्ट तुम्हाला रहिवासाचा पुरावा म्हणून वापरता येणार नाही. पासपोर्टची नवी सीरिज लवकरच येणार असून, नव्या सीरिजनुसार शेवटचे पान कोरं ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पासपोर्टवर आता तुमचा पत्ता पाहायला मिळणार नाही.सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ब-याचदा पासपोर्टचा रहिवासाचा पुरावा म्हणून वापर केला जातो. सद्यस्थितीत पासपोर्टच्या अंतिम पानावर संबंधित पासपोर्टधारकाचा पत्ता छापला जातो. परंतु या नव्या सीरिजमध्ये शेवटचे पान खाली ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्या पानावर काहीही छापलं जाणार नाही.
पासपोर्टच्या नव्या सीरिजमध्ये लवकरच बदल होणार आहे. नव्या सीरिजनुसार लवकरच तुम्हाला पासपोर्ट मिळणार आहे. पान कोरं ठेवण्याबरोबरच पासपोर्टच्या रंगामध्येही बदल केला जाणार आहे. सध्या पासपोर्टच्या पहिल्या पानावर पासपोर्टधारकाच्या छायाचित्रासह काही आवश्यक माहिती दिली जाते. त्यानंतर पासपोर्टच्या शेवटच्या पानावर संबंधिताचा पत्ता छापला जातो. पासपोर्टच्या शेवटच्या पानावर बारकोड देण्यात येणार असून, बारकोडला स्कॅनिंग केल्यानंतर संबंधितांची सगळी माहिती मिळणार आहे.