नवी दिल्ली: सध्या भाजपा-संघ एका बाजूला आणि संपूर्ण भारत दुसऱ्या बाजूला असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधलं आहे. बिहारच्या मुजफ्फरपूरमधील बालिकाश्रमात मुलींवर अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली. या घटनेच्या निषेधार्थ जंतरमंतरवर राष्ट्रीय जनता दलानं आयोजित धरणं आंदोलनात ते बोलत होते.
जंतरमंतरवरील आंदोलनात विरोधी पक्षांची एकी पुन्हा एकदा दिसून आली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी सुरू केलेल्या धरणं आंदोलनात आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, डाव्या पक्षांचे नेते डी. राजा, सीताराम येचुरी, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, शरद यादव सहभागी झाले आहेत. कर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर पुन्हा एकदा विरोधक एकत्र आल्यानं 2019 मध्ये भाजपाविरोधीत 'महाआघाडी'च्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.
या आंदोलनात बोलताना राहुल गांधींनी भाजपा-संघासह बिहार सरकारवरही टीका केली. 'सध्या भाजपा-संघ एका बाजूला आणि देशातील जनता दुसऱ्या बाजूला अशी स्थिती आहे. पुढेदेखील हेच चित्र असेल. गेल्या चार वर्षांमध्ये जे घडलंय, ते कोणालाही आवडलेलं नाही,' असं राहुल यावेळी म्हणाले. 'देशातील परिस्थिती वाईट आहे. देशातील गरिब जनतेवर, मग ती महिला असो वा लहान दुकानदार किंवा मग दलित, सगळ्यांवर अन्याय होत आहे. आम्ही या परिस्थितीत देशाच्या जनतेसोबत उभे आहोत,' असं राहुल गांधींनी म्हटलं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना थोडी जरी लाट वाटत असेल, तर त्यांनी या बलात्कार प्रकरणातील दोषींना शिक्षा द्यावी, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी संताप व्यक्त केला.