लोक फक्त कुटुंबाला मोठं करतात, मी तसं केलं नाही, घराणेशाहीला आमचा विरोध - नितीश कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 04:10 PM2024-01-24T16:10:04+5:302024-01-24T16:10:53+5:30
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील समाजवादाचा मोठा चेहरा कर्पुरी ठाकूर यांची आज १०० वी जयंती आहे.
पाटणा: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील समाजवादाचा मोठा चेहरा असलेले दिवंगत कर्पुरी ठाकूर यांची आज १०० वी जयंती आहे. त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून भारत सरकारने कर्पुरी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. मंगळवारी याची घोषणा करण्यात आली. कर्पुरी यांच्या जयंतीनिमित्त आज बिहारमधील विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्रीनितीश कुमार यांनी देखील पाटणा येथील कार्यक्रमात सहभाग नोंदवला. पाटणा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर सभेला संबोधित करताना नितीश कुमार यांनी घराणेशाहीवर टीका केली.
नितीश कुमार म्हणाले की, कर्पुरी ठाकूर यांनी कधीही त्यांच्या कुटुंबाला पुढे नेण्याचा विचार केला नाही. पण, आज लोक फक्त आपले कुटुंब वाढवत आहेत. प्रत्येकजण आपल्या घरातील सदस्याचा विचार करत आहे. मात्र, मी माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला पुढे आणले नाही. आजकाल लोक आपल्या मुलांना नेता बनवतात. मुलगा स्वतःला मोठा नेता म्हणवतो. मोठमोठ्या गोष्टी बोलतात. पण कर्पुरी या सगळ्याला अपवाद ठरले. त्यांनी त्यांच्या पदाचा लाभ आपल्या मुलाला कधीच दिला नाही. त्यांनी आपल्या कुटुंबाला कधीच पुढे नेले नाही. पण, आज लोक काहीही बोलतात. मात्र, त्यांना बोलू द्या, त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही.
घराणेशाहीला आमचा विरोध - नितीश कुमार
तसेच कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्यात येत आहे, आम्ही सुरुवातीपासूनच ही मागणी करत होतो. आम्ही केंद्र सरकारला विनंती केली होती आणि ती मागणी अखेर मान्य झाली आहे. कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. त्याबद्दल मी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांचे अभिनंदन करतो. पंतप्रधानांनी रामनाथ ठाकूर यांना फोन केला असला तरी त्यांनी मला फोन केला नाही, पण केंद्र सरकारने कर्पुरी ठाकूर यांचा हा गौरव केल्याबद्दल मी त्यांचे आणि पंतप्रधानांचे अभिनंदन करतो.
दरम्यान, केंद्र सरकारने आमची एक मागणी मान्य केली असून आता बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणीही मान्य होईल अशी अपेक्षा आहे, असेही नितीश यांनी नमूद केले. याशिवाय कर्पुरी ठाकूर यांनी दारूवर बंदी घातली होती आणि मागासलेल्या आणि अत्यंत मागासवर्गीयांसाठी अनेक कामे केली होती. आरक्षणाची व्याप्ती देशभर वाढवली पाहिजे. जनता दल युनायडेट कधीही घराणेशाहीचे समर्थन करत नाही, असे नितीश कुमार यांनी आणखी सांगितले.