मुंबई : आज देशभरात 72 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. जगभरातही स्थायिक झालेल्या भारतीयांकडून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. मात्र, हे अनिवासी भारतीय भारतीय बनावटीचा झेंडा वापरू शकत नाहीत. त्यांना चीनमध्ये बनलेल्या झेंड्यावरच समाधान मानावे लागत आहे.
भारतात झेंडा फडकावण्यासंबंधी कडक नियमावली आहे. काही वर्षांपूर्वीच सोसायट्या, खासगी संस्थांना झेंडावंदन करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, परदेशात भारतीय तिरंगा फडकावण्यासंबंधी कोणतीही बंधने नसतानाही अनिवासी भारतीय मनात असुनही भारतीय बनावटीचा झेंडा फडकावू शकत नाहीत. कारण, कुरियर कंपन्या भारतीय बनावटीचे झेंडे परदेशात पाठविण्यास इच्छुकच नसल्याचे समोर आले आहे.
परदेशात फेडेक्स, टीएनटी, युपीएस आणि डीएचएल सारख्या कुरियर कंपन्या कुरियर सेवा पुरवितात. मात्र, तिरंगा परदेशात पोहोचविण्य़ास त्या नकार देतात. यामागचे कारण मात्र सांगत नाहीत. याबाबत गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यास तेही आश्चर्यचिकत झाले. त्यांच्या म्हणण्यानुसार झेंड्याच्या नियमावलीमध्ये अशी कोणतीही बंदी नाही.
कुरियर कंपन्यांकडून याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. मात्र, तिरंग्याची ने-आण किंवा परदेशात नेण्यावर बंदी असल्याचे वाटते. कुरियर कंपन्यांच्या या मनमानीमुळे देशातील तिरंगा बनविणाऱ्या कंपन्यांना परदेशातून येणाऱ्या मागण्या नाकाराव्या लागत आहेत. यामुळे अस्सल भारतीय तिरंग्याऐवजी चीनमध्ये बनलेल्या तिरंग्याचा वापर करावा लागत आहे.