नवी दिल्ली: भारतीय हवाई दलानं नियंत्रण रेषा ओलांडून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले, त्यावेळी त्या भागात 300 मोबाईल अॅक्टिव्ह होते, अशी आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे हे फोन अॅक्टिव्ह असल्याची माहिती भारतीय गुप्तचर विभागाच्या तांत्रिक विभागाला मिळाली होती. एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले, याची चर्चा सुरू असताना ही आकडेवारी पुढे आली आहे. एअर स्ट्राइकच्यावेळी जवळपास 300 मोबाईल अॅक्टिव्ह असल्यानं तिथे किती दहशतवादी असतील, याचा अंदाज लावता येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील दहशतवादी तळांवर हल्ला करण्याची परवानगी भारतीय हवाई दलाला मिळाली. यानंतर हवाई दलानं लक्ष्यभेद करण्याआधी राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेनं (एनटीआरओ) तळांवर देखरेख ठेवण्यास सुरुवात केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. 26 फेब्रुवारीला मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी बालकोटवर बॉम्बफेक केली. हवाई दलाच्या वैमानिकांनी जवळपास 1000 किलोंचे बॉम्ब फेकले. यावेळी जैशचा मुख्य आणि सुरक्षित स्थळ समजल्या जाणाऱ्या बालाकोटमध्ये टॉप कमांडर्स आणि अनेक दहशतवादी वास्तव्यास होते. 'तांत्रिक देखरेख सुरू असताना तिथे जवळपास 300 मोबाईल फोन ऍक्टिव्ह असल्याचं आढळून आले. या भागात 300 मोबाईल अॅक्टिव्ह असल्याची माहिती मिळाल्यानंतर हवाई दलानं बॉम्बफेक केली,' अशी माहितीदेखील सूत्रांनी दिली. यावेळी देशाच्या इतर गुप्तचर यंत्रणादेखील एनटीआरओच्या संपर्कात होत्या. त्यांनादेखील बालाकोटच्या तळांवर 300 मोबाईल अॅक्टिव्ह असल्याचं आढळून आले होते. मात्र हवाई दलाच्या कारवाईतील मृत दहशतवाद्यांचा आकडा अद्याप सरकारकडून जाहीर करण्यात आलेला नाही. आज सकाळी हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनीही मृत दहशतवाद्यांच्या संख्येवर बोलणं टाळलं. आम्ही लक्ष्यभेद करतो. मेलेल्या दहशतवाद्यांचा आकडा मोजणं आमचं काम नाही, असं धनोआ म्हणाले होते.
एअर स्ट्राइकवेळी बालाकोटमध्ये 300 मोबाईल अॅक्टिव्ह; गुप्तचर यंत्रणांकडून आकडेवारी समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 7:14 PM