नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. एप्रिलमध्ये कोरोनाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. आता मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने नवा विक्रम केला. देशात पहिल्यांदा एकाच दिवसात कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १ हजार ९९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर ३ हजार ५२३ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २ लाख ९९ हजार ९८८ इतकी आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ९१ लाख ६४ हजार ९६९ वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी १ कोटी ५६ लाख ८४ हजार ४०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर २ लाख ११ हजार जणांचा मृत्यू झाला. सध्याच्या घडीला देशात ३२ लाख ६८ हजार ७१० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाची लागण होणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याने, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड मोठा ताण आहे. अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
वाढता प्रादुर्भावn एप्रिलमध्ये कोरोनाने देशात वेगाने हातपाय पसरले आहेत. n ५ एप्रिलला देशात पहिल्यांदा एक लाख रुग्ण आढळले. त्यानंतर, हा आकडा सातत्याने वाढत गेला. n १५ एप्रिलला देशात प्रथमच २ लाख रुग्णांची नोंद झाली. n २२ एप्रिलला देशात पहिल्यांदाच ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. n १ मे रोजी देशात ४ लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत.
स्पुटनिक व्ही लसीचा पहिला डोस भारतातn रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीच्या दीड लाख कुप्या शनिवारी दुपारी भारतात दाखल झाल्या. n देशात १८ ते ४४ या वयोगटांतील नागरिकांच्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. n स्पुटनिक व्ही लसीमुळे या मोहिमेला गती मिळण्याची शक्यता आहे. भारताने या लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली.