लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील लॉकडाऊनचे निर्बंध मागे घेण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू झालेला असतानाच, कोरोना साथीचा जोर कायम आहे. देशभरात सोमवारी कोरोनाचे आठ हजारांवरनवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येने २ लाखांकडे वाटचाल केली आहे.
महिनाभरापूर्वी भारतात कोरोनाचे ३७ हजार रुग्ण होते. त्यांच्यात पाचपट वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार : आजारातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या ९५ हजारांवर झाली आहे. कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या तुलनेत या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ४८.१८ टक्के इतके आहे. मुंबईत ४० हजारांवर रुग्ण आहेत. येथे आठ दिवसांत रुग्णसंख्या ३० हजारांवरून ४० हजारांवर गेली आहे.
सर्वाधिक रुग्ण असलेल्या पहिल्या दहा राज्यांत महाराष्ट्र पहिल्या, तर तमिळनाडू दुसºया क्रमांकावर आहे. तमिळनाडूमध्ये कोरोनाचे २३ हजारांवर रुग्ण असून, तिथे १८४ जणांचा बळी गेला आहे. दिल्लीत २० हजारांवर रुग्ण असून, बळींची संख्या ५००हून अधिक आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये गुजरात दुसºया क्रमांकावर होता. त्याला आता तमिळनाडूने मागे टाकले आहे. गुजरातमध्ये १७ हजारांवर रुग्ण असून, बळींची संख्या एक हजारांवर आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनमधील निर्बंध मागे घेण्यासाठी तीन टप्प्यांची योजना आखली आहे. मात्र, त्याचे अनुकरण न करता राज्यांनी अनेक निर्बंध ३० जूनपर्यंत कायम ठेवले आहेत. प्रत्येक राज्य कोरोना साथीची त्यांच्याकडील स्थिती लक्षात घेऊन मगच निर्बंध हटविण्याबाबत निर्णय घेणार आहे.महाराष्ट्रासह चार राज्यांत चार हजारांवर बळीदेशातील कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या तुलनेत महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, दिल्ली या चार राज्यांतील रुग्णांची संख्या १ लाख ३० हजारांवर गेली आहे. देशातील बळींची संख्या पाच हजारांहून अधिक झाली असून, त्यातील चार हजारांपेक्षा जास्त बळी महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, दिल्लीमध्ये गेले आहेत.