तिरुवनंतपूरम - ज्याप्रकारे सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असते त्याच प्रमाणे अश्लीलताही सुद्धा बघणाऱ्यांच्या नजरेतच असते, अशी टिप्पणी केरळ हायकोर्टाने केली आहे. मल्याळम मासिक गृहलक्ष्मीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हे निरीक्षण नोंदवले आहेत. तसेच मासिकाविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. गुरुवारी या प्रकरणी निकाल सुनावताना न्यायालयाने गृहलक्ष्मी मासिकाविरोधातील याचिका फेटाळून लावली. ज्याप्रकारे सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असते त्याच प्रमाणे अश्लीलताही सुद्धा बघणाऱ्यांच्या नजरेतच असते. या छायाचित्रात काही अश्लील आहे असे आम्हाला वाटत नाही. तसेच छायाचित्राला दिलेल्या कॅप्शनमध्येही पुरुषांसाठी काही आक्षेपार्ह टिप्पणी आहे, असे आम्हाला वाटत नाही, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने केली. गृहलक्ष्मी या मासिकाने मार्च महिन्यातील आपल्या अंकात नवजात मुलाला स्तनपान करत असेल्या महिलेचे छायाचित्र प्रसिद्ध केले होते. या छायाचित्रात पेशाने एअरहॉस्टेस असलेली आणि मॉडेल व लेखिका म्हणून काम पाहणारी गिलू जोसेफ ही मुलाला स्तनपान करत दिसत होती. तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांकडे रोखून पाहणाऱ्यांना मुखपृष्ठावरून एक संदेशही देण्यात आला होता. केरळला माता सांगत आहेत की, कृपया आमच्याकडे रोखून पाहू नका, आम्हाला स्तनपानाची गरज आहे, असे या संदेशात म्हटले होते.
दरम्यान, एंटोनी डोमिनिक आणि डामा शेषाद्री नायडू यांच्या खंडपीठाने निकाल देताना सांगितले की, "भारतीय कलेने नेहमीच मनुष्याच्या शरीराचे सौंदर्य दाखवले आहे. मग कामसूत्र असो वा राजा रविवर्माची चित्रे वा अजंठा येथील शिल्पे. पूर्वीच्या जमान्यातील लोक आपल्यापेक्षा अधिक समजुतदार होते." दरम्यान ही याचिका दाखल करणारे वकील विनोद मॅथ्यू यांनी म्हटले होते की, हे छायाचित्र खूप कामूक असून, महिलांना कमीपणा दाखवणारे आहे. तसेच ख्रिश्चन महिलेने मंगळसूत्र आणि कुंकू लावण्यालाही आक्षेप घेण्यात आला होता.