सेल्फीचा मोह नडला! जखमी अस्वलाच्या हल्ल्यात टॅक्सी ड्रायव्हरचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 09:57 AM2018-05-04T09:57:57+5:302018-05-04T09:57:57+5:30
सेल्फी काढण्याचा हा मोह अनेकांच्या जीवावरही बेतताना दिसतो.
भुवनेश्वर- एखाद्या ठिकाणी गेल्यावर सेल्फी काढण्याचा मोह आपल्याला कधीच आवरत नाही. समुद्र किनारी, प्राणी संग्रहालयात किंवा इतर कुठल्याही पर्यटनस्थळी गेल्यावर सेल्फी काढताना लोक पाहायला मिळतात. सेल्फी काढण्याचा हा मोह अनेकांच्या जीवावरही बेतताना दिसतो. अशीच एक घटना ओडीशामध्ये घडली आहे. जंगलातील जखमी अस्वलाबरोबर सेल्फी काढण्याच्या इच्छेने एका टॅक्सी ड्रायव्हरचा जीव गेला आहे. प्रभू भारता असं या टॅक्सी ड्रायव्हरचं नाव असून अस्वलाच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
ओडीशातील नबारंगपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास प्रभू भारता हा टॅक्सी ड्रायव्हर पापडाहंडी या ठिकाणाहून परतत होता. त्याच्यासोबत इतर काही लोक होते. एका लग्नासाठी हे सगळे लोक गेले होते. जंगलात या ड्रायव्हरने लघुशंका करण्यासाठी गाडी थांबवली. त्याचवेळी त्याला तिथे जखमी अस्वल दिसले. त्यानंतर प्रभू भारताला अस्वलासोबत सेल्फी काढण्याचा मोह झाला. अस्वलासमोर न जाण्याचं त्याच्याबरोबर असलेल्या अनेकांनी त्याला बजावलं. पण त्यांचं म्हणणं न जुमानता तो अस्वलाजवळ गेला व सेल्फी काढू लागला. व्यक्ती समोर आलेला पाहून चिडलेल्या जखमी अस्वलाने ड्रायव्हरवर हल्ला करून त्याला ठार केलं. अस्वलाच्या हल्ल्यात भारता याचा जागीच मृत्यू झाल्याचं फॉरेस्ट रेंजर धनुर्जया मोहपात्रा यांनी सांगितलं.
घटनास्थळापासून 10 किलोमीटर अंतरावर वनविभागाचं कार्यालय आहे. बुधवारी रात्री उशिरा वनविभागाने भारता याचा मृतदेह ताब्यात घेतला. अस्वल जेव्हा प्रभू भारता याच्यावर हल्ला करत होता तेव्हा त्याच्याबरोबर असणारे इतर लोक ही घटना पाहत उभे होते. धक्कादायक म्हणजे प्रभूला वाचविण्याऐवजी ते लोक मोबाइलमध्ये शूटिंग करण्यात व्यस्त होते. प्रभूला वाचवायला कुणीही पुढे आलं नाही. जंगलात भटकणाऱ्या एका कुत्र्याने अस्वलावर भुंकून त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र अस्वलापुढे त्याचा टिकाव लागला नाही.
प्रभू भारताच्या कुटुंबीयांना त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी 30 हजार रुपये देण्यात आले आहेत. या संदर्भात ड्रायव्हरच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी म्हणून स्थानिकांनी आंदोलनही केलं. ज्यानंतर येत्या १५ दिवसात नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन वन विभागाने दिलं आहे.