अरे बापरे ! मध्यप्रदेशात उंटांचा शाही विवाह सोहळा
By admin | Published: May 20, 2016 01:43 PM2016-05-20T13:43:56+5:302016-05-20T14:28:25+5:30
मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात प्राणीप्रेमी नरेश रघुवंशी यांनी चक्क आपल्या उंटिणीचा विवाह सोहळा आयोजित केला होता
Next
>ऑनलाइन लोकमत -
भोपाळ, दि. 20 - मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात प्राणीप्रेमी नरेश रघुवंशी यांनी चक्क आपल्या उंटिणीचा विवाह सोहळा आयोजित केला होता. नरेश रघुवंशी यांनी आपल्या कल्लो उंटिणीचा विवाह लक्ष्मण सिंग यांच्या गोपाल उंटाशी केला आहे. हा विवाह सोहळा साध्या पद्धतीने आयोजित न करता अत्यंत थाटामाटात शाही पद्धतीने साजरा करण्यात आला. या लग्नासाठी तब्बल हजार लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर हिंदू पद्धतीने हा विवाह सोहळा करण्यात आला ज्यामध्ये चक्क सप्तपदी करण्यात आली. पिंपळाच्या झाडाला सात फेरे मारल्यानंतर हा विवाह सोहळा संपन्न झाला.
नरेश रघुवंशी यांच्या फार्म हाऊसवर हा विवाह सोहळा पार पडला. बुधवारी गणेश पुजनासोबत सुरु झालेला कार्यक्रम गुरुवारी रात्रीपर्यंत चालू होता. यावेळी नरेश रघुवंशी यांनी मुलीच्या पित्याची भुमिका बजावत सर्व जबाबदारी घेतली होती. लक्ष्मण सिंग यांनीदेखील मुलाची बाजू असल्याने वरात काढली होती. फार्म हाऊसपर्यंत काढलेल्या या वरातीत हजारो लोक सामील झाले होते.
वरपक्षाचे म्हणजे उंटाकडचे लोक पोहोचल्यानंतर त्यांना गिफ्ट्सदेखील देण्यात आले. 'कल्लोला मी आपल्या मुलांप्रमाणेच मानतो', असं नरेश रघुवंशी सांगतात. लग्नानंतरही कल्लो आपल्यासोबत राहणार आहे, कारण गोपालला घरजावई करुन घेण्यासाठी लक्ष्मण सिंग यांनी परवानगी दिली असल्याचं नरेश रघुवंशी आनंदाने सांगतात.