लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील प्रवाशांना ओला चालकांच्या मनमानीचा फटका सहन करावा लागतो आहे. मंगळवारी ओला चालकाच्या मनमानीमुळे तीन विद्यार्थिनींना मनस्ताप सहन करावा लागला. या विद्यार्थिनींकडून ओला चालकानं अवघ्या 800 मीटर अंतरासाठी तब्बल 333 रुपये भाडे आकारलं. याशिवाय अनेक ओला चालक प्रवाशांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन दुप्पट ते अडीचपट भाडं आकारत असल्याच्या तक्रारीदेखील पुढे आल्या आहेत. आम्ही प्रति किलोमीटर अंतरासाठी सहा रुपये आकारतो, असा ओला प्रशासनाचा दावा आहे. तशा जाहिरातीदेखील कंपनीकडून केल्या जातात. याशिवाय कंपनी डिस्टन्स फेअर म्हणून प्रति किलोमीटरमागे दोन रुपये आकारते. मात्र लखनऊमध्ये ओला चालकानं 800 मीटरसाठी तब्बल 333 रुपये आकारले. एस. कुमारी नावाची विद्यार्थिनी तिच्या दोन मैत्रिणींसह प्रवेश परीक्षा देण्यासाठी ए. पी. सेन गर्ल्स कॉलेजमध्ये जात होती. त्यासाठी तिनं चारबाग परिसरातून ओला पकडली. मात्र हा प्रवास तिला चांगलाच महाग पकडला.ओला चालक मोहम्मद गुफराननं 800 मीटरसाठी या तीन विद्यार्थिनींकडून 333 रुपये भाडे आकारलं. ओलाच्या बिलमध्ये तसा उल्लेखदेखील आहे. 800 मीटर प्रवास, प्रवासाचा वेळ 58 मिनिटं, प्रवास भाडं 262.37 रुपये, सेवा कर 19.94 रुपये आणि एकूण भाडं 333 रुपये अशी आकडेवारी बिलामध्ये नमूद करण्यात आली आहे. याशिवाय अनेक ओला चालक प्रवाशांकडून दुप्पट ते अडीचपट भाडं आकारत आहेत. मात्र यावर काहीही भाष्य करण्यास ओला प्रशासनानं नकार दिला.
ओलानं अवघ्या 800 मीटर अंतरासाठी आकारलं तब्बल 333 रुपये भाडं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 7:20 AM