नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुन्हा एकदा नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी ओमर अब्दुल्ला यांनी काही छायाचित्र ट्विटरवर शेअर करत केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. (omar abdullah alleged we get locked up in our homes with no explanation)
ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी ट्विट केलेल्या फोटोंमध्ये त्यांच्या घरासमोर पोलिसांच्या दोन गाड्या उभ्या असल्याचे दिसत आहे. ''ऑगस्ट २०१९ नंतर नवीन जम्मू काश्मीर उदयाला आले आहे. आम्हांला कोणतेही कारण न देता घरात नजरकैद करण्यात आले आहे. त्यांनी माझ्या वडिलांना (विद्यमान खासदार) आमच्या घरी नजरकैद केले आहे, याहून वाईट काय असू शकते. एवढेच नव्हे, तर माझी बहीण आणि तिच्या मुलांनाही घरात बंदिस्त करण्यात आले आहे'', असे ट्विट ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे.
लोकशाहीचे नवे मॉडल
दुसऱ्या एका ट्विटमध्ये ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर टीका करत म्हटले आहे की, लोकशाहीचे नवीन मॉडेल आता समोर येत आहे. कोणतेही कारण सांगितल्याशिवाय आम्हांला आमच्याच घरात बंदिस्त करून ठेवले जात आहे. आमच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही घरात येण्याची परवानगी नाकारली जात आहे. याचे तुम्हांला आश्चर्य वाटत असले, तरी मला याचा प्रचंड राग येत आहे आणि मनात कटूता निर्माण होत आहे, असे अब्दुल्ला यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले.
"न्यायालयात न्याय मिळत नाही, तेथे जाणे पश्चाताप करून घेण्यासारखे आहे"
दरम्यान, जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांना अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तब्बल २३२ दिवसांच्या नजरकैदेनंतर २४ मार्च २०२० रोजी त्यांना मुक्त करण्यात आले होते. तसेच पीडीपी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला.