नजरकैदेत ठेवल्याचा ओमर अब्दुल्लांचा दावा, ट्वीटमध्ये लिहिले ‘ये नया काश्मीर’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 07:29 AM2021-02-15T07:29:22+5:302021-02-15T07:29:47+5:30
Omar Abdullah : अब्दुल्ला यांनी केलेल्या ट्विटमध्ये दाेन फाेटाे शेअर केले आहेत. त्यांच्या घरासमाेर दाेन वाहने उभी असल्याचे त्यात दिसत आहेत. त्यापैकी एक बुलेटप्रूफ वाहन आहे.
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पुन्हा नजरकैदेत ठेवल्याचा आराेप केला आहे. ओमर अब्दुल्ला यांनी घरासमाेरील काही छायाचित्रे ट्वीट करत सरकारवर टीका केली आहे.
अब्दुल्ला यांनी केलेल्या ट्विटमध्ये दाेन फाेटाे शेअर केले आहेत. त्यांच्या घरासमाेर दाेन वाहने उभी असल्याचे त्यात दिसत आहेत. त्यापैकी एक बुलेटप्रूफ वाहन आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, की ऑगस्ट २०१९ नंतरचा हा नवा जम्मू आणि काश्मीर आहे. काेणत्याही कारणाविना आम्ही घरात बंद आहाेत. विद्यमान खासदार असलेल्या माझ्या वडिलांना आणि मला त्यांनी आमच्या घरात नजरकैदेत ठेवले आहे. माझी बहीण आणि तिच्या मुलांनाही त्यांनी तिच्या घरात नजरकैदेत ठेवले आहे. हे वाईट आहे.
त्यानंतर अब्दुल्ला यांनी आणखी एक ट्विट करून हे लाेकशाहीचे एक नवे माॅडेल असल्याचे म्हटले आहे. अब्दुल्ला यांनी लिहिले, की हे तुमचे डेमाेक्रेसीचे नवे माॅडेल आहे. म्हणजे काेणतेही स्पष्टीकरण न देता आम्हाला आमच्याच घरात नजरकैदेत ठेवले आहे. एवढेच नव्हे तर घरात काम करणाऱ्यांनाही आत येऊ दिले जात नाही. तुम्ही आश्चर्यचकित झाले असला. परंतु, मला याचा खूप राग येत आहे.