श्रीनगर: अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये वेगानं घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. यानंतर अब्दुल्ला यांनी राज्यातील जनतेला शांत राहण्याचं आवाहन केलं. काल मध्यरात्री श्रीनगरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं असून आज सकाळी ६ वाजल्यापासून जम्मूतही कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.
सध्या जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद आहे. मात्र त्याआधी नजरकैदेत असलेल्या अब्दुल्ला आणि मुफ्तींनी ट्विट्स केली. लवकरच इंटरनेट सेवा खंडित होणार असल्याचं समजतं आहे. संचारबंदीदेखील लागू केली जात आहे. काय होणार आहे, अल्लाह जाणे. एक मोठी रात्र सुरू होत आहे. या कठीण काळात आपण सोबत राहायला हवं आणि जे होईल त्याचा एकत्रितपणे सामना करायला हवा, असं मुफ्तींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं. मुफ्तींचं हे ट्विट ओमर अब्दुल्लांनी रिट्विट केलं आहे.
आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा ओमर अब्दुल्लांनी केला. त्यानंतर याची चर्चा काश्मीरमध्ये सुरू झाली. 'आज मध्यरात्री मला नजरकैद केलं जाईल, असं वाटतं. बाकीच्या राजकीय नेत्यांनादेखील नजरकैदेत ठेवलं जाईल. मात्र खरंच असं होईल का, याबद्दलची माहिती मिळवण्याचा कोणताही मार्ग नाही. आमचं काय होईल माहीत नाही. मात्र सर्वशक्तीमान अल्लाहनं सर्वांसाठी तयार केलेली योजना उत्तम आहे. त्यावर शंका घेऊ शकत नाही. सर्वांना शुभेच्छा. सुरक्षित राहा आणि शांतता पाळा,' असं अब्दुल्लांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.