लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशामध्ये मंगळवारी कोरोनाचे जवळपास नऊ हजार नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या २ लाख १८ हजारांवर गेली आहे. मुख्य म्हणजे यापैकी १ लाख रुग्ण गेल्या १५ दिवसांतील आहेत.
देशात पहिला रुग्ण केरळमध्ये ३० जानेवारी रोजी आढळला होता. त्यानंतर १८ मे रोजी म्हणजे तब्बल ११० दिवसांनी देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख झाली आणि त्यानंतरच्या १५ दिवसांत आणखी १ लाख रुग्णांची भर पडली. म्हणजेच देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आतापर्यंत ५ हजारांहून अधिक रुग्ण मरण पावले आहेत.
देशात या आजाराच्या बळींची संख्या ५ हजारांवर गेली आहे. मात्र, या साथीच्या फैलावाने अद्याप कळस गाठलेला नाही, असे इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या संशोधक डॉ. निवेदिता गुप्ता यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी भारताने योजलेले उपाय परिणामकारक ठरले आहेत. कोरोनाने अन्य देशांत माजविलेल्या हाहाकाराच्या पार्श्वभूमीवर भारतातील परिस्थिती खूपच चांगली आहे. इथे आतापर्यंत जवळपास ५० टक्के रुग्ण बरे झाले आहेत आणि आपल्याकडे मृत्यूदरही खूप कमी आहे.देशामध्ये जून-जुलै या दोन महिन्यांमध्ये कोरोनाचा फैलाव आणखी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नीती आयोग, एम्स तसेच केंद्र सरकारमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये दररोज ८ हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. आतापर्यंत ९५,५२६ जण उपचारांनंतर पूर्णपणे बरे झाले आहेत.
देशात कोरोनामुळे आतापर्यंत बळी गेलेल्यांपैकी ५० टक्के लोक साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते, तर ७० टक्के लोक एकापेक्षा अधिक व्याधींनी ग्रस्त होते. देशात कोरोनाच्या सामुदायिक संसर्गाला सुरुवात झाली आहे, असे मत काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. त्याबद्दल आयसीएमआरच्या संशोधक डॉ. निवेदिता गुप्ता यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा आजार संसर्गजन्य असून, त्याचा किती मोठा फैलाव होतो, यावर लक्ष ठेवावे लागेल. फैलावाबाबत आयसीएमआरने ३४ हजार लोकांशी संपर्क साधून एक पाहणी नुकतीच केली. त्याचे निष्कर्ष या आठवड्याच्या अखेरीस आम्ही जाहीर करू.९४२ विशेष रुग्णालये३० मेपर्यंतची आकडेवारी लक्षात घेतली, तर देशात कोरोना उपचारांसाठी ९४२ विशेष रुग्णालये असून, तेथील विलगीकरण कक्षात १,५८,९०८ खाटा, तसेच अतिदक्षता विभागात २०,६०८ खाटा, तर आॅक्सिजन देण्याची सोय असलेल्या ६९,३८४ खाटांची सोय करण्यात आली आहे. देशात २,३८० कोरोना प्रतिबंधक केंद्रे असून, त्यातील विलगीकरण कक्षांमध्ये १,३३,६७८ खाटा, तसेच अतिदक्षता विभागांत १०,९१६, तर आॅक्सिजन देण्याची सोय असलेल्या ४५,७५० खाटांची सोय आहे. देशात कोरोना केअर सेंटरमध्ये ६,६४,३३० व क्वारंटाईन सेंटरमध्ये १०,५४१ खाटांची सुविधा आहे.