Omicron News: ओमायक्रॉन वेगानं पसरणार, पण...; AIIMSच्या माजी प्राध्यापकांनी दूर केलं टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 05:09 PM2021-12-05T17:09:45+5:302021-12-05T17:10:41+5:30
Omicron News: देशात आतापर्यंत ५ जणांना ओमायक्रॉनची लागण; राज्यात एक जण पॉझिटिव्ह
नवी दिल्ली: संपूर्ण जगाला घोर लावणाऱ्या ओमायक्रॉननं महाराष्ट्रातही प्रवेश केला आहे. काल डोंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. त्याआधी कर्नाटकात दोन रुग्ण सापडले. गुजरात आणि दिल्लीत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे ओमायक्रॉननं बाधितांचा एकूण आकडा ५ वर पोहोचला आहे. ओमायक्रॉननं किती धोकादायक, त्यापुढे कोरोना प्रतिबंधात्मक लस निष्प्रभ ठरते का, असे प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. त्यासंदर्भात एम्सच्या कार्डियोलॉजी विभागाचे माजी प्राध्यापक के. श्रीनाथ रेड्डींनी महत्त्वाची माहिती दिली.
कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव अधिक वेगानं होतो. दक्षिण आफ्रिका आणि युरोपमध्ये ते दिसून आलं आहे, असं रेड्डी म्हणाले. या व्हेरिएंटची लागण झाल्यावर माणूस गंभीर आजारी पडतो हे अद्यापपर्यंत दिसून आलेलं नाही. उलट ओमायक्रॉनची लागण झालेल्यांना रुग्णालयाची फारशी आवश्यकता भासलेली नाही. डेल्टामुळे लाखो लोकांचा जीव गेला. मात्र अद्याप तरी ओमायक्रॉनमुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही आणि ही बाब दिलासादायक असल्याचं त्यांनी सांगितलं.
कोरोना प्रतिबंधात्मक लस ओमायक्रॉनपासून संरक्षण करेल का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. लसीचा परिणाम कमी होऊ शकतो. कारण लस घेतल्यानंतर निर्माण झालेल्या अँटिबॉडींची संख्या हळूहळू कमी होत जाते. मात्र यामुळे लसीचा प्रभाव पूर्णपणे संपेल असं होत नाही, अशी माहिती रेड्डी यांनी दिली. लसी गंभीर आजार रोखू शकतात. मात्र कोरोना संक्रमण रोखू शकत नाहीत. संक्रमण रोखण्याचं काम मास्क करतो. त्यामुळे लस घेतली असेल तरीही आपण मास्क घालायला हवा, असं रेड्डी म्हणाले.
देशाला बूस्टर डोसची गरज आहे का, असा प्रश्न रेड्डी यांना विचारण्यात आला. त्यावर या प्रश्नाचं उत्तर लसीच्या परिणामकारकतेवर अवलंबून असल्याचं त्यांनी सांगितलं. 'काही लसी अँटिबॉडीज वेगानं वाढवतात. तर काही लसी घेतल्यानंतर अँटिबॉडीजचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं. लसी लसींमध्ये फरक आहे आणि व्यक्ती व्यक्तींमध्येही फरक आहे. ओमायक्रॉन लोकांवर किती गंभीर परिणाम करतो हे पाहून बूस्टर डोसचा निर्णय घ्यायला हवा,' असं रेड्डी यांनी म्हटलं.