नवी दिल्ली : भारतासह जगभरात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनची (Omicron) चिंता वाढली आहे. देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 23 वर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर चार दिवसांत हा आकडा 20 च्या पुढे गेला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 10 जणांना नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
दरम्यान, बंगळुरूमध्ये ओमायक्रॉनची लागण झालेला डॉक्टर बरा झाल्यानंतर पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. बंगळुरूमध्ये राहणारा हा डॉक्टर भारतातील ओमायक्रॉनच्या पहिल्या दोन रग्णांपैकी एक होता. तर दुसरा रुग्ण हा दक्षिण आफ्रिकेचा रहिवासी होता आणि तो प्रशासनाला न सांगता दुबईला गेला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे,
गुजराती वंशाचा असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील नागरिकाला ओमायक्रानचा संसर्ग झाल्यानंतर क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाला न कळवता तो दुबईला पळून गेला. दुसरीकडे, बंगळुरू महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ओमायक्रॉनची लागण झालेल्या डॉक्टरचा रिपोर्ट पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तसेच, अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, डॉक्टर सध्या क्वारंटाइन आहेत आणि त्यांना आतापर्यंत कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत.
दुसरीकडे, क्वारंटाइनचे नियम मोडून दुबईला पळून गेलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाही तर तो ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत होता. त्या हॉटेलचे व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, कारण त्याला आरोग्य अधिकाऱ्यांना न सांगता हॉटेलमधून बाहेर पडू दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांवर कर्नाटक महामारी कायद्याच्या विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.