जबलपूर : काेराेना विषाणूच्या ओमायक्राॅन व्हेरिएंटने सर्वांची चिंता वाढविली आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका जर्मन नागरिकाला काेराेनाचा संसर्ग झाला असून त्याच्या घशातील स्रावाचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जर्मन नागरिक एका विवाह समारंभात सहभागी हाेण्यासाठी आला हाेता. ताे नवी दिल्लीमार्गे जबलपुरात दाखल झाला हाेता.
विमानतळावर अँटिजेन चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली हाेती. मात्र, आरटी-पीसीआर चाचणी पाॅझिटीव्ह आली. त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्याच्या संपर्कातील ५० जणांचे नमुने गाेळ करण्यात आले आहेत. मध्य प्रदेशात आतापर्यंत ओमायक्राॅन व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळलेला नाही. दरम्यान, केरळमध्ये धाेकादायक देशांमधून आलेल्या १० पैकी ८ काेराेनाबाधित रुग्णांना ओमायक्राॅनचा संसर्ग झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले हाेते. दाेघांचे अहवाल लवकरच प्राप्त हाेतील, अशी अपेक्षा आराेग्यमंत्री वीणा जाॅर्ज यांनी सांगितले.
जहाज रवाना...अमेरिकेतील न्यू ऑरलियन्स येथे एका क्रूझ जहाजावरील प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांसह १७ जणांना काेराेनाचा संसर्ग झाला हाेता. ते जहाज नव्या प्रवाशांसह सफरीसाठी रवाना झाले आहे. नाॅर्वेजियन बेकअवे असे या क्रूझचे नाव आहे. बाधितांपैकी काेणामध्येही लक्षणे नव्हती. संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच क्रूझमध्ये प्रवेश करण्याची परवानगी आहे. क्रूझमध्ये ३९६३ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.
नव्या व्हेरिएंटचा अंदाज हाेताच : रामाफाेसादक्षिण आफ्रिकेत काेराेनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ हाेत आहे. त्याबाबत राष्ट्रपती सिरिल रामफाेसा यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की चौथी लाट आणि नव्या व्हेरिएंटचा अंदाज हाेताच. ओमायक्राॅनबाबत दक्षिण आफ्रिकेसाेबत जगभरातील शास्त्रज्ञ संशाेधन करत आहेत तरीही नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. तसेच लाॅकडाऊनसारख्या कठाेर नियमांची अंमलबजावणी करण्यापूर्वीच मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे रामाफाेसा म्हणाले.