नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेतून जगातील १३ देशात पसरणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळं लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉन वेगाने कोरोना संक्रमित करत असल्यानं WHO च्या वैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यातच लसीमुळे मानवी शरीरात निर्माण झालेल्या इम्युनिटीवरही ओमायक्रॉनचा परिणाम होत असल्याने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं WHO चं म्हणणं आहे.
गमलेया रिसर्च इन्स्टिस्टूट ऑफ एपिडेमियोलॉजी एँड माइक्रोबायोलॉजीने दावा केला आहे की, स्पुतनिक व्ही आणि स्पुतनिक लाइट ही कोरोना लस नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनशी लढण्यास सक्षम आहे. ओमायक्रॉनचा प्रभाव स्पुतनिक लसीवर होत नसल्याचं इन्स्टिट्यूटचं म्हणणं आहे. कारण अन्य लसीच्या तुलनेत व्हायरसच्या म्युटेशनसोबत लढण्याची क्षमता स्पुतनिक लसीत असल्याचं म्हटलं आहे.
त्याचसोबत जर कुठल्याही संशोधनाची गरज नसेल तर आम्ही २० फ्रेब्रुवारी २०२२ पर्यंक शंभर मिलियन स्पुतनिक ओमायक्रॉन बूस्टर डोस उपलब्ध करू असंही इन्स्टिट्यूटनं म्हटलं आहे. सध्या जगात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता पसरली आहे. या व्हेरिएंटने संक्रमित झालेल्या व्यक्तीमधील लसीचा प्रभाव कमी होऊ शकतो असंही वैज्ञानिकांनी सांगितले आहे.
३० पेक्षा जास्त म्युटेशनमुळे अधिक संक्रमक
ओमायक्रॉन व्हायरसची गंभीरता पाहता एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, कोरोनाच्या या व्हेरिएंटच्या स्पाइक प्रोटीनमध्ये ३० पेक्षा अधिक बदल झाले आहेत. ज्यामुळे त्याला इम्यूनोस्केप तंत्र विकसित करण्याची क्षमता मिळते. स्पाइक प्रोटीनमुळे कुठल्याही मानवी शरीरातील पेशींमध्ये व्हायरसला सहज प्रवेश मिळतो. त्यामुळे तो व्यक्ती संक्रमित होतो असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच या नव्या व्हेरिएंटचं संक्रमण रोखण्यासाठी आक्रमक टेस्टिंगवर जोर द्यावा लागेल. इतकचं नाही तर ज्या लोकांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला नाही अशांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावं लागेल. आरोग्य तज्ञ आणि शास्त्रज्ञ जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे त्याचा परिणाम आणि संसर्ग संभाव्यतेचा अभ्यास करत आहेत. सध्या भारतानेही या व्हेरिएंटमुळे अधिक सतर्कता बाळगली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग आणि टेस्टिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत.