नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका खासगी वृत्तवाहिनीला ई-मेलद्वारे मुलाखत दिली. त्यामध्ये मोदींनी एनआरसी, जीएसटी, रोजगार आणि देशातील राजकीय वातावरणावर भाष्य केले. रोजगारासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, देशात गेल्या वर्षभरात 1 कोटी नागरिकांना नोकरी मिळाल्याचा दावा मोदींनी केला आहे. त्यामुळे देशातील तरुणांना नोकरी मिळत नसल्याचा प्रचार बंद केला पाहिजे, असेही मोदींनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टच्या भाषणापूर्वीच एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी मोदींनी पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा मुद्दा बनलेल्या एनआरसीवरही भाष्य केले. तसेच मॉब लिंचिंग आणि रोजगार निर्मित्तीच्या प्रश्नावरही उत्तरे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 2 कोटी रोजगार निर्माण करणार, असल्याची घोषणा करण्यात आली होती. याबाबत काँग्रेस आणि विरोधकांकडून नेहमीच मोदींना टार्गेट करण्यात येते. त्यावर बोलताना, गेल्या वर्षभरात देशात 1 कोटींपेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण झाल्याचे म्हटले आहे. सन 2017 ते 2018 या कालावधीत 45 लाख औपचारिक रोजगारनिर्मित्ती झाली आहे. तर ईपीएफओच्या आकडेवारीवरुन गेल्या वर्षभरात देशात 70 लाख नवीन रोजगार निर्माण झाल्याचे मोदींनी सांगितले. पर्यटन विकास, मुद्रालोन, स्टार्टअप आणि बांधकामाच्या क्षेत्रात रोगगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत असल्याचे मोदी म्हणाले. तसेच डिजीटल इंडियाच्या माध्यमातून मोबाईल कंपनींच्या युनिटची संख्याही वाढली आहे. सन 2014 साली देशात केवळ दोन मोबाईल युनिट होते, आता देशात 120 मोबाईल युनिट झाले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाल्याचेही मोदींनी सांगितले.