इंफाळ : मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात दोन समुदायांमध्ये झालेल्या गोळीबारात गावातील एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. दरम्यान, थौबल येथे जमावाच्या हल्ल्यात बीएसएफचे ३ जवान जखमी झाल्यानंतर तेथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
बुधवारी रात्री संशयित अतिरेक्यांनी शेजारच्या डोंगराळ भागातून कांगचूपवर गोळीबार केला. सखल भागातील गावातील स्वयंसेवकांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.बुधवारी रात्री इंफाळ खोऱ्यात आणि डोंगराळ भागात अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या, त्यातीलच ही घटना आहे.
या घटनेत टी. मनोरंजन या स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ गुरुवारी मोठ्या संख्येने महिलांनी इंफाळमध्ये मोर्चा काढला हाेता.
अनेक जण जखमीइंफाळ पश्चिम जिल्ह्यातील फयेंग, कडंगबंद आणि कौत्रुक, इंफाळ पूर्वेतील सगोलमांग, कांगपोकपीमधील सिनम कोम इत्यादी ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारात अनेक जण जखमी झाले.