नवी दिल्ली : गेल्या सोमवारी इस्रायलच्याविमानाचे इंजिन हवेतच बंद पडले. या आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी भारतीय नौदल एका हाकेवर मदतीला धावले. दरम्यान, थायलंडहून इस्रायलला जाणाऱ्या अल एल एअरलाइन्सच्या विमानाचे गोव्यात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. भारतीय नौदलाद्वारे संचालित डेबोलिन एअरफील्डवर या विमानाचे 1 नोव्हेंबरला इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानात 276 प्रवासी होते.
यासंदर्भात भारतीय नौदलाने बुधवारी ट्विटरवर सांगितले की, विमानाचे एक इंजिन बंद झाले होते, त्यामुळे 1 नोव्हेंबरच्या पहाटे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. तसेच, अल एल एअरलाइन्सचे 082 विमान बँकॉकहून तेल अवीवला जात होते आणि त्यात 276 प्रवासी होते, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. याचबरोबर, एअरफील्ड अपग्रेडेशनच्या कामामुळे बंद आहे, परंतु त्यांच्या अल्प सूचनेवर विमानाला इमर्जन्सी लँडिंगसाठी हे उपलब्ध करून दिले, असेही नौदलाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, गोवा विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी सांगितले होते की, सोमवारी पहाटे 4 वाजता इस्रायलच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी मंगळवारी संध्याकाळी पर्यायी विमानाने तेल अवीवकडे रवाना झाले. तसेच, इस्रायल विमानाच्या वैमानिकाच्या लक्षात आले की विमानाचे इंधन गळतीचे संकेत चालू झाले आहेत, त्यामुळे त्याला प्रोटोकॉलनुसार प्रभावित इंजिन बंद करावे लागले आणि आपत्कालीन लँडिंग करण्याची परवानगी मागितली, असे मलिक म्हणाले.