सुकमा - छत्तीसगडमधील सुकमा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी (9 जुलै) चकमक झाली आहे. या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. नक्षलवाद्याकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी डब्बाकोंटा परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला. अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
डब्बाकोंटा परिसरात नक्षलवाद्यांचे काही म्होरके लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शोधमोहीम हाती घेतली. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे तर इतरही काही नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेला दोन दिवसांपूर्वी मोठे यश मिळाले होते. छत्तीसगडमधील धामतरी येथे पोलीस स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते. चारही नक्षलवाद्यांचे मृतदेह जप्त करण्यात आले असून, मृत नक्षलवाद्यांकडून शस्त्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. धामतरी येथे पोलीस स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीस सुरुवात झाली होती. यावेळी जवानांनी हा हल्ला धैर्याने परतवून लावत चार नक्षलवाद्यांना ठार केले होते.
नक्षलवाद्यांशी चकमकीत सीआरपीएफचे तिघे शहीद
नक्षलवाद्यांसोबत शुक्रवारी (29 जून) झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) तीन जवान शहीद झाले व एक मुलगी ठार झाली होती. सीआरपीएफची 199 वी बटालियन आणि राज्याचे पोलीस मोटारसायकलवर त्या भागात गस्त घालत असताना केशकुतुल (जिल्हा बिजापूर) खेड्याजवळ नाल्यापाशी सकाळी 11 च्या सुमारास ही चकमक झाली, असे बिजापूरचे पोलीस अधीक्षक दिव्यांग पटेल यांनी सांगितले होते. या चकमकीत दोन मुलीही सापडल्या, त्यात एक मरण पावली, तर दुसरी जखमी झाली होती. मोटारसायकवर ही गस्त घालणारी तुकडी केशकुतुल येथील छावणीपासून भैरामगडकडे निघाली होती. केशकुतुलमधून ही तुकडी जात असताना सशस्त्र नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू करताच चकमक सुरू झाली, असे पटेल म्हणाले होते.