पुलवामा: सुरक्षा दलाच्या जवानांना एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आलं आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामात आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात एक दहशतवादी मारला गेला. या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. पुलवामात मध्यरात्री सव्वा दोनपासून सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. केंद्रीय राखीव पोलीस दल, राष्ट्रीय रायफल्स आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप यांनी संयुक्त कारवाई करत दहशतवाद्याला घेरलं. यानंतर सुरू झालेल्या चकमकीत दहशवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं. एन्काऊंटर संपल्यानंतर जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. तेव्हा दहशतवाद्याचा मृतदेह हाती लागला. पुलवामासोबतच दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. त्याआधी पुलवामात गुरुवारी (काल) दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू असताना लष्कराच्या एका अधिकाऱ्याला वीरमरण आलं. या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा दलांकडून सर्च ऑपरेशन सुरू असताना दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेनं गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं. या कारवाईत दोन जवान आणि एक नागरिक जखमी झाला. चकमकीत मारले गेलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे दहशतवादी एका घरात लपून बसले होते. दहशतवाद्यांनी घरातील एका नागरिकाला ओलीस ठेवलं होते. त्याचा मृतदेहदेखील जवानांना सर्च ऑपरेशनदरम्यान आढळून आला.