नवी दिल्ली- नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. भारताच्या इतिहासात 8 नोव्हेंबर 2016 हा दिवस कोरला गेला. 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा एका रात्रीतून चलनातून काढून घेतल्यानंतर त्याचे अनेक चांगले-वाईट परिणामही दिसले. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सोशल मीडियावर या निर्णयाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. आज काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी 8 नोव्हेंबर हा काळा दिवस पाळण्याचं ठरविलं आहे, तर सत्ताधारी भाजपाने काळा पैसाविरोधी दिन म्हणून तो साजरा करण्याचं ठरवलं आहे.
नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेस आणि विरोधी पक्ष आज ‘काळा दिवस’ पाळणार आहेत. भाजपाही हा दिवस ‘काळापैसाविरोधी दिवस’ म्हणून पाळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होत असताना मंगळवारी रात्रीपासूनच काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दिल्लीतील रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाबाहेर रात्री उशीरा काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. तर दुसरीकडे बुधवारी सकाळी छत्तीसगडमध्ये नोटाबंदीविरोधात काँग्रेसतर्फे मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं.
नोटाबंदीनं उद्धवस्त झालेल्यांच्या पाठीशी काँग्रेस - राहुल गांधीकाँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नोटाबंदीवरुन पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ''सरकारची नोटांबदी ही राष्ट्रीय आपत्ती आहे. नोटाबंदीनं उद्धवस्त झालेल्यांच्या पाठीशी काँग्रेस खंबीरपणे उभे आहे''', असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.