कांदा निर्यातबंदी उठण्याची अधिसूचना निघणार कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 01:45 AM2020-02-29T01:45:22+5:302020-02-29T07:06:50+5:30
निर्यातबंदी उठविल्याबाबत संभ्रम
नाशिक : केंद्रीय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी कांदा निर्यातबंदी उठल्याचे संकेत देणारे ट्वीट केल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी निर्यातबंदी उठल्याची अजून अधिसूचना निघालेली नाही. त्यामुळे निर्यातबंदी उठविल्याबाबत संभ्रम आहे. मात्र त्यांच्या एका टिष्ट्वटमुळे कांदा दराने उसळी घेतली आहे.
बुधवारी सायंकाळी ७ वाजून १७ मिनिटांनी पासवान यांनी टिष्ट्वट केले होते. मात्र एक दिवस उलटून गेल्यानंतरही शुक्र वारी वाणिज्य मंत्रालयाने अधिकृतपणे त्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली नव्हती.
पाच महिन्यांनंतर निर्यात सुरू होणार असल्याने निर्यातदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु निर्यात परवान्याचे निकष कसे असतील, किमान निर्यात मूल्य किती असेल, याची स्पष्टता नसल्याचे व्यापारी ओमप्रकाश राका यांनी सांगितले.
शासनाने अधिक विलंब न करता अधिसूचना काढावी. त्यामुळे निर्यातदार विविध देशांतील आयातदारांशी सौदे ठरवू शकतील, असे व्यापारी नितीनकुमार जैन यांनी सांगितले.
आम्ही वाट पाहतोेय
सर्वाधिक कांदा आवक व खरेदी लासलगाव बाजारपेठेत होत असते. येथून निर्यातही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे अधिसूचनेची प्रतीक्षा आहे.
- सुवर्णा जगताप, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव