नवी दिल्ली-
हनुमान चालीसा वादावरुन तुरुंगात जावं लागलेल्या आणि सध्या जामीनावर बाहेर असलेल्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. मुंबईत रवी राणा यांच्या खार येथील राहत्या फ्लॅटला महानगरपालिकेनं जारी केलेल्या नोटीसवरुन राणांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. यावेळी रवी राणा यांनी राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत माझा तर एकच फ्लॅट आहे. पण अनिल परब यांचे १५ फ्लॅट आहेत. ठाकरे सरकारला फक्त माझाच फ्लॅट दिसला, असा आरोप रवी राणा यांनी केला.
शिवसेनेची उद्धव ठाकरेंनी 'सुलेमान सेना' केली, 'शकुनीमामा' बुडवणार; राणांचा खोचक टोला
"राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुनच माझ्या फ्लॅटला नोटीस पाठवण्यात आली आहे. मुंबईत माझा एकच फ्लॅट आहे. पण अनिल परब यांचे १५ फ्लॅट आहेत. त्यांना फक्त माझाच फ्लॅट दिसला. मी १५ वर्षांपूर्वी हा फ्लॅट घेतला असून तेव्हापासून पालिकेला कधी यातलं अनधिकृत बांधकाम दिसलं नाही. पण आम्ही हनुमान चालीसा पठणाची काय इच्छा व्यक्त केली तर माझ्या फ्लॅट विरोधात उद्धव ठाकरेंनी चौकशी आदेश दिले. ही हुकुमशाही नाही, तर काय आहे? याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरुन आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेविरोधात प्रचार करणार आहोत", असं रवी राणा यांनी सांगितलं.
१४ मे रोजी नवी दिल्ली हनुमान चालीसा पठणशिवसेनेच्यावतीनं येत्या १४ मे रोजी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्याच दिवशी नवी दिल्लीत महाराष्ट्र सरकार विरोधात आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदबुद्धी द्यावी यासाठी नवी दिल्लीतील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम करणा आहोत, असं रवी राणा यांनी जाहीर केलं आहे. "तुम्ही सभेत आम्ही मर्द आहोत. मर्दासारखं काम करतो असं वारंवार म्हणता. पण तुम्ही एका महिला खासदाराला जेलमध्ये टाकून तिला चुकीची वागणूक देऊन तुमचा नामर्दपणा दाखवून दिला आहे. तुम्ही जेव्हा भाजपाशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलात त्याच दिवशी तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांची हत्या केली. तुम्ही त्याच दिवशी सर्व शिवसैनिकांना पोरकं केलं", असंही रवी राणा म्हणाले.