Operation Bluestar:अमृतसरमध्ये झालेल्या 'ऑपरेशन ब्लू स्टार'ला आज 38 वर्षे पूर्ण होत आहेत. ऑपरेशन ब्लूस्टारच्या वर्षपूर्तीनिमित्त कट्टरपंथी संघटनांनी अमृतसरमध्ये बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण परिसराला छावणीत रुपांतरित केले आहे. प्रत्येक कोपऱ्यावर पोलिस लक्ष ठेवून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसरमध्ये 7 हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत. 1984 मध्ये याच दिवशी सुवर्ण मंदिरात लष्कराचे ऑपरेशन ब्लू स्टार झाले होते.
अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराभोवती सर्वत्र पोलिसांचा पहारा आहे. परिसरात फ्लॅग मार्च काढण्यात येत आहे. सुवर्णमंदिराच्या सुरक्षेमध्ये कोणताही हलगर्जीपणा होऊ नये यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. ऑपरेशन ब्लू स्टारच्या वर्षपूर्तीनिमित्त कट्टरपंथी संघटनांनी अमृतसरमध्ये बंदचे आवाहन केल्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
अमृतसर बंदची हाकऑपरेशन ब्लू स्टारच्या 38व्या वर्षपूर्तीनिमित्त कट्टरपंथी संघटनांनी अमृतसर बंदची हाक दिली आहे. दल खालसा नावाच्या संघटनेनेही ऑपरेशन ब्लू स्टारच्या विरोधात ठिकठिकाणी पोस्टर लावले. हे पाहता अमृतसरच्या सुरक्षेला कोणीही तडा जाऊ नये म्हणून सुरक्षा दलाच्या जवानांनी मोर्चेबांधणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतसरच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या चार कंपन्यांसह सुमारे 7,000 जवान तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय दरबार साहिबकडे जाणाऱ्या बाहेरच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
कट्टरपंथी शीख संघटनांचा मोर्चा दल खालसा, शिरोमणी अकाली दल (अमृतसर) यांसह कट्टरपंथी शीख संघटना आणि खलिस्तान समर्थक गटांशी संबंधित सदस्यांनी ऑपरेशन ब्लू स्टारच्या 38 व्या वर्षपूर्तीनिमित्त रविवारी शहराकडे कूच केली. यावेळी 'आझादी मार्च'चे आयोजन करण्यात आले होते. लॉरेन्स रोडवरील भाई वीरसिंग मेमोरिअल हॉलपासून मोर्चाला सुरुवात होताच आंदोलकांनी खलिस्तानचे झेंडे आणि फलक घेऊन स्वतंत्र खलिस्तानची मागणी केली. तसेच, यावेळी अनेकांनी खलिस्तान जिंदाबादच्या घोषणाही दिल्या.