नवी दिल्ली : विरोधकांनी माझ्यावर जरूर टीका करा, मात्र राष्ट्रीय सुरक्षेवरून राजकारण नको, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हटले आहे. हवाई दलाच्या ताफ्यात राफेल विमाने असती तर पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या वेळी अधिक संहारक मारा करता आला असता असेही ते म्हणाले. राफेल विमान खरेदी प्रकरणावरून काँग्रेसने अनाठायी टीका चालविल्याचा आरोपही मोदी यांनी केला.ते म्हणाले की, भारतीय हवाई दलाला राफेल विमानांची उणीव जाणवत आहे. राफेल विमाने असती तर पाकिस्तानवर आणखी जोरदार हल्ले चढविता आले असते असे आता जनताच म्हणत आहे. याआधीच्या सरकारमधील स्वार्थी लोकांपायी देशाला आजवर खूप भोगावे लागले आहे. आता हेच लोक राफेल विमाने खरेदीवरून राजकारण करत आहेत. विरोधकांनी माझ्यावर जरूर टीका करावी. त्यासाठी त्यांना कोणीही अटकाव करणार नाही. आमच्या सरकारच्या चुकाही जरूर निदर्शनाला आणून द्याव्यात. मात्र राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील मुद्द्यांचा राजकारणासाठी वापर करू नये. त्यामुळे देशाचेच नुकसान होत आहे.राफेल विमान खरेदीत आर्थिक घोटाळा झाल्याचा व त्यात मोदी यांनी अनिल अंबानींना मोठा आर्थिक फायदा करून दिल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने करत आहेत. त्या आरोपांचा मोदी सरकारने याआधीच इन्कार केला आहे. मोदी म्हणाले की, काँग्रेसची सरकारे केंद्रात असताना संरक्षण व्यवहारांमध्ये अनेक घोटाळे झाले. त्या काळात जीपपासून ते शस्त्रे, पाणबुड्या, हेलिकॉप्टर्सच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला असून त्याची फळे लष्कराला भोगावी लागली आहेत. प्रत्येक संरक्षण व्यवहारामधील दलाल कोणाचे निकटवर्तीय होते हे साऱ्या देशाला माहिती आहे. लष्करी जवानांसाठी माझ्या सरकारच्या कारकिर्दीत दोन लाख तीस हजार बुलेटप्रुफ जॅकेट खरेदी करण्यात आली. या खरेदी प्रस्तावाकडे आधीच्या केंद्र सरकारने २००९ सालापासून दुर्लक्षच केले होते. माझ्या सत्ताकाळात संरक्षण व्यवहारातील दलालांनाच जागाच उरलेली नाही असाही दावा मोदी यांनी केला.>दहशतवादाचा एकजुटीने मुकाबला करूनरेंद्र मोदी यांनी पाटणा येथील सभेत रविवारी सांगितले की, मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र येऊया असा नारा विरोधी पक्षांनी दिला आहे. मात्र दहशतवादाचा मुकाबला एकजुटीने करूया असे माझे सर्वांना सांगणे आहे. बिहारमध्ये नितीशकुमार-भाजपा आघाडी सरकारने उत्तम काम केले आहे.
विरोधकांनो माझ्यावर टीका करा पण, राष्ट्रीय सुरक्षेवरून राजकारण नको - मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 4:59 AM