फोन टॅपिंगवरून गदारोळ; राहुल गांधी, दोन केंद्रीय मंत्र्यांवर सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 04:35 AM2021-07-20T04:35:17+5:302021-07-20T04:38:39+5:30

पेगॅससद्वारे केलेल्या पाळतीशी संबंधिक सर्व कागदपत्रे जनतेसाठी खुली करावीत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

opposition alleged centre govt in parliament over rahul Gandhi and two Union ministers surveillance | फोन टॅपिंगवरून गदारोळ; राहुल गांधी, दोन केंद्रीय मंत्र्यांवर सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप

फोन टॅपिंगवरून गदारोळ; राहुल गांधी, दोन केंद्रीय मंत्र्यांवर सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप

googlenewsNext

शीलेश शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी, विरोधी पक्षांतील अन्य काही नेते, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, अश्विनी वैष्णव व प्रल्हाद पटेल हे दोन केंद्रीय मंत्री, न्यायाधीश, पत्रकार यांच्यासहित अनेक मान्यवरांचे फोन टॅप करून त्यांच्यावर मोदी सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत सोमवारी गदारोळ केला. भाजप ही भारतीय जाजूस पार्टी असल्याची टीका काँग्रेसने केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र इस्रायली स्पायवेअर पेगॅससद्वारे पाळत ठेवल्याच्या आरोपांचा केंद्र सरकारने इन्कार केला आहे. या प्रकरणावरून संसदेचे कामकाज रोखून धरण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला. 

पेगॅससद्वारे केलेल्या पाळतीशी संबंधिक सर्व कागदपत्रे जनतेसाठी खुली करावीत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. राज्यसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खरगे व लोकसभा सदस्य अधीररंजन चौधरी यांनी सांगितले की, इस्रायलची कंपनी एनएसओने  पेगॅसस हे स्पायवेअर तयार केले असून ते फक्त विविध देशांच्या सरकारांनाच विकण्यात येते. मात्र केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आम्ही कोणाचेही फोन हँक केलेले नाहीत, असे सांगून विरोधकांचे आरोप फेटाळले. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, १२० लोकांचे फोन हँक करण्यात आल्याची माहिती मिळाली असल्याचे तत्कालीन केंद्रीय माहिती-तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये म्हटले होते.

सरकारलाही बाजू मांडण्याची संधी द्या

सर्व विषयांवरील टोकदार प्रश्न विरोधी पक्षांनी अधिवेशनात सरकारला जरूर विचारावेत. मात्र सभागृहात विरोधकांनी कोणताही गदारोळ न माजविल्यास सरकार यांची उत्तरे व्यवस्थितपणे देऊ शकेल, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. 

- लोकसभेत नव्या सदस्यांचा शपथविधीनंतर प्रथेनुसार पंतप्रधान माेदी नव्या मंत्र्यांची ओळख करून देण्यासाठी उभे राहिले. मात्र, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी इंधनाच्या वाढलेल्या किमती तसेच कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. 

- अनेक सदस्य फलके घेऊन लोकसभाध्यक्षांच्या आसनापुढे आले. या गोंधळात मोदींना मंत्र्यांचा परिचय करता आला नाही. शेवटी विरोधकांवर ताशेरे ओढत मोदींनी नवीन मंत्र्यांची यादी पटलावर ठेवली. ती अध्यक्षांनी मान्य केली.

- अनेक महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आल्याची बातमी एका वेब पोर्टलने संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आधी प्रसिद्ध केली. हा योगायोग असू शकत नाही, असा दावा केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे. केंद्र सरकारने कोणावरही पाळत ठेवलेली नाही असेही त्यांनी संसदेत सांगितले. 

- अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या व्हॉट्सअॅप संदेशांवर पेगॅससच्या माध्यमांतून नजर ठेवल्याचे आरोप याआधी झाले होते. पण ते बिनबुडाचे ठरले होते. भारतीय लोकशाही व येथील यंत्रणांची बदनामी करण्यासाठी पुन्हा तशाच पद्धतीने आरोप करण्यात आले आहेत, असा दावा अश्विनी वैष्णव यांनी केला.

राज्यसभेच्या १४ जागा रिक्त, पोटनिवडणूक मात्र एकाच जागेवर

राज्यसभेच्या सध्या १४ जागा रिक्त आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने केवळ एकाच जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केल्यामुळे सर्वच पक्षांना आश्चर्याचा धक्का बसला. यामुळे महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह इतर काही राज्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये दिनेश त्रिवेदी यांनी तृणमूल कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त जागेसाठी आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
 

Web Title: opposition alleged centre govt in parliament over rahul Gandhi and two Union ministers surveillance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.