प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या शपथविधीदरम्यान विरोधकांचा लोकसभेत गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 05:50 PM2019-06-17T17:50:59+5:302019-06-17T17:51:53+5:30
भाजपाच्या वादग्रस्त खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या शपथ घेत असताना लोकसभेमध्ये जोरदार गोंधळ झाला.
नवी दिल्ली - लोकसभेच्या निवडणुकीनंतर संसदेच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून, लोकसभेमध्ये नवनियुक्त खासदारांच्या शपथविधीची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, या शपथविधीवेळी भाजपाच्या वादग्रस्त खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या शपथ घेत असताना लोकसभेमध्ये जोरदार गोंधळ झाला.
प्रज्ञा सिंह ठाकूर या शपथ घेण्यासाठी आल्यावर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षातील सदस्यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावास आक्षेप घेतला. प्रज्ञा सिंह या संस्कृत भाषेत शपथ घेत होत्या. त्यांनी संस्कृतमध्ये आपले नाव उच्चारताच विरोधी पक्षांकडून विरोधात सुरुवात झाली. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शपथ घेताना केवळ स्वत:चे नाव घ्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली.
BJP winning candidate from Bhopal, Pragya Singh Thakur takes oath as Lok Sabha MP. pic.twitter.com/W2okmWxkjf
— ANI (@ANI) June 17, 2019
मी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर स्वामी पूर्णचेतनानंद अवधेशानंद गिरी, असा नामोल्लेख प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला होता. त्यानंतर विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी आपला शपथविधी थांबवला. त्यानंतर लोकसभेत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना शपथेदरम्यान वडलांचे नावही घेण्यास सांगितले. त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतानाही गोंधळ झाला. यादरम्यान प्रोटेम स्पीकर यांनी प्रज्ञा सिंह यांच्याकडून त्यांचे विजयी झाल्याचे प्रमाणपत्रही मागून घेतले. अखेरीस विरोधी पक्षांच्या सदस्यांना आवरत प्रोटेम स्पीकर यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना तिसऱ्यांदा शपथ घेण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांचा शपथविधी पूर्ण झाला.