नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनादरम्यान अगुस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारावर निवेदन केल्याप्रकरणी काँग्रेसने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विरुद्ध राज्यसभेत हक्कभंगाची नोटीस दिली आहे. संसदेतील सदस्य शांताराम नायक यांनी सांगितले की, आपण व अन्य एक सदस्य हुसैन दलवाई यांनी ही नोटीस दिली आहे. ते म्हणाले की, पीआयबीच्या (पत्र सूचना कार्यालय) वेबसाईटवर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हवाल्याने हेलिकॉप्टर व्यवहारावर सरकारची बाजू मांडणारी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे संसद आणि सदस्यांच्या हक्कभंगाचे प्रकरण दाखल केले जाऊ शकते. शांताराम नायक यांनी सांगितले की, राज्यसभेच्या महासचिवांना नोटीस देण्यात आली आहे. ती स्वीकारण्यासाठी सोमवारी निवेदन करण्यात येईल. त्यानंतर ते विशेषाधिकार समितीकडे पाठवून संरक्षणमंत्र्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल. संरक्षणमंत्र्यांनी गुरुवारी काँग्रेसने केलेला दावा फेटाळला होता. यूपीए सरकारच्या कार्यकाळात आॅगस्टा वेस्टलँड कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले होते; पण सध्याच्या एनडीए सरकारने या यादीतून कंपनीला हटविले, असा दावा काँग्रेसने केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पर्रीकरांविरुद्ध काँग्रेसने दिली हक्कभंग नोटीस
By admin | Published: April 30, 2016 3:59 AM