राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी विरोधी पक्षाचा संयुक्त उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 12:27 AM2020-09-09T00:27:48+5:302020-09-09T00:27:56+5:30
- शीलेश शर्मा नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी काँग्रेसने संयुक्त उमेदवार मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया ...
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी काँग्रेसने संयुक्त उमेदवार मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला संसदीय कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या दहा सदस्यांशिवाय मल्लिकार्जुन खडगे, ए. के. अॅन्टोनी, राहुल गांधी, रवनीत बिट्टू यांच्यासह अन्य नेते व खासदारही उपस्थित होते.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. मोदी यांंना खोटे बोलण्याऐवजी वस्तुस्थिती ध्यानात घेऊन बोलण्यास भाग पाडण्यासाठी काँग्रेसच्या खासदारांनी आक्रमक व्हावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. बेरोजगारी हा सर्वांत गंभीर मुद्दा आहे. काँग्रेसच्या खासदारांनी आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेत आणि संसदेबाहेर सरकारवर चौफेर हल्ला करावा. चीनच्या घुसखोरीवरूनही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले, असे सूत्रांनी सांगितले. मित्र पक्षांसोबत योग्य समन्वय राखण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.
बैठकीत ठरलेल्या रणनीतीनुसार काँग्रेस मित्र पक्षांना सोबत घेऊन सरकारने जारी केलेल्या अध्यादेशांना विरोध करील. कोरोनाच्या साथीदरम्यान जनतेला वाऱ्यावर सोडल्याबद्दल काँग्रेस संसदेत सरकारवर निशाणा साधेल. याशिवाय कोलमडलेली अर्थव्यवस्था, लॉकडाऊनसह इतर महत्त्वाचे मुद्देही उपस्थित करणार आहे. सरकारने आडकाठी केल्यास गोंधळ घालण्याचीही तयारी काँग्रेसने केली आहे.