कोलकाता : येथील उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या राज्य निवडणूक आयोगाला पंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख नव्याने जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे उमेदवारांना आणखीकाही दिवसांचा अवधी मिळू शकणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने सुरुवातीला अर्ज दाखल करण्यासाठी ९ एप्रिलची मुदत निश्चित केली होती. नंतर ही मुदत वाढवून देण्याचा निर्णय आयोगाने घेतला होता परंतु १० एप्रिल रोजी आयोगाने एक अध्यादेश काढून अर्ज भरण्यासाठी वाढवून दिलेली मुदत रद्द केली. उच्च न्यायालयाने आयोगाचा हा अध्यादेश रद्दबातल केला आहे.भारतीय जनता पार्टी, माकप आणि पार्टी फॉर डेमोक्रॅटिक सोशलिझम या पक्षांनी आयोगाच्या अध्यादेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांसाठी १, ३ आणि ५ मे रोजी मतदान होणार आहे तर मतमोजणी ८ मे रोजी होणार आहे.
निवडणूक आयोगाला नव्याने तारीख जाहीर करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:29 AM