मध्य प्रदेशातही मदरशांमध्ये 15 ऑगस्टला तिरंगा फडकवण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 09:50 PM2017-08-12T21:50:20+5:302017-08-14T08:46:40+5:30
उत्तर प्रदेशपाठोपाठ आता मध्य प्रदेश सरकारनंही राज्यांतील मदरशांमध्ये नवीन फर्मान जारी केला आहे. मध्य प्रदेश सरकारनेदेखील राज्यातील 5 हजार मदरशांमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्याचे निर्देश दिले आहेत.
भोपाळ, दि. 12 - उत्तर प्रदेशपाठोपाठ आता मध्य प्रदेश सरकारनंही राज्यांतील मदरशांमध्ये नवीन फर्मान जारी केला आहे. मध्य प्रदेश सरकारनेदेखील राज्यातील 5 हजार मदरशांमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय तिरंगा रॅलीचेही आयोजन करुन या कार्यक्रमाची छायाचित्रं संबंधित विभागाला ई-मेलद्वारे पाठवण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे.
मध्य प्रदेशातील मदरशांमध्ये सरकारकडून अशा पद्धतीचे आदेश देण्याची ही पहिलीच वेळ आहे. मध्य प्रदेश मदरसा बोर्डचे अध्यक्ष सय्यद इमादउद्दीन यांनी सांगितले की, ''राज्यातील सर्व मदरशांमध्ये 15 ऑगस्टनिमित्त तिरंगा फडकवल्याची छायाचित्रं आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमांचीही छायाचित्रं संबंधित विभागांना पाठवावी लागणार आहेत. राज्यातील सर्व मदरशांना अशाप्रकारचे आदेश देण्यात आले आहेत''.
मदरशांनी 15 ऑगस्टला 'तिरंगा' फडकवावा - योगी सरकारचा आदेश
उत्तर प्रदेशातील मदरसा शिक्षा परिषदेने त्यांच्याशी संबंधित असणा-या सर्व मदरशांना येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत गायनाचे निर्देश दिले आहेत. 15 ऑगस्टला भारत 70 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. मदरशा शिक्षा परिषदेने परिपत्रक जारी केले असून, त्यांच्याशी संबंधित असणा-या सर्व मदरशांना आदेशांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
मदरशांना प्रथमच स्वातंत्र्यदिनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास सांगितले आहे. यापूर्वी सुद्धा मदरशांना ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत गायनाचे निर्देश दिले होते. स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये होणा-या कार्यक्रमांचेही व्हिडीओ रेकॉर्डींग करण्याचे आदेश आहेत. उत्तर प्रदेशात मदरसा परिषदेने 8 हजार मदरशांना मान्यता दिली आहे. यातील 560 मदरशांना राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते.
ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत गायन सकाळी आठ वाजता घेण्यास सांगितले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी मिठाई देण्यात येईल. परिषदेने राष्ट्रगीत हिंदी आणि ऊर्दू दोन्ही भाषांमध्ये पाठवले आहे. योगी आदित्यनाथ सरकारच्या या निर्णयावरुन उत्तर प्रदेशात मोठा गहजब होण्याची शक्यता आहे.