नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची पक्षाच्या मध्य प्रदेश शाखेच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली असून, पक्षाच्या राज्यस्तरीय प्रचारसमितीचे प्रमुख म्हणून खा. ज्योतिरादित्य शिंदे यांची नियुक्ती केली आहे. मध्य प्रदेशमध्ये यावर्षीच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याच्या तयारीच्या दृष्टीने या नेमणुका काँग्रेस पक्षाने केल्या आहेत.कमलनाथ याआधी पक्षाचे सरचिटणीस व हरयाणाचे प्रभारी म्हणून होते. त्यांची मध्य प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड व्हावी, असा आग्रह माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांनी काँग्रेस नेतृत्वाकडे धरला होता असे सांगण्यात आले. कमलनाथ हे मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघाचे लोकसभेवर प्रतिनिधीत्व करतात. ते यापूर्वी केंद्रीय मंत्रीही होते.त्यांच्याबरोबरच मध्य प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून बाला बच्चन, रामनिवास रावत, जितू पटवारी, सुरिंदर चौधरी या चौघांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गहलोत यांनी गुरुवारी एका पत्रकाद्वारे दिली आहे.मध्य प्रदेशमध्ये दीर्घकाळ भाजपची सत्ता असून पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवराजसिंग चौहान हे २९ नोव्हेंबर २००५ साली मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. गेली १३ वर्षे ते या पदाची धुरा सांभाळत आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सारी ताकद लावण्यास सुरुवात केली असून, त्यामुळेच मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. या राज्यामध्ये काँग्रेसतर्फे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल हे पक्षाने अद्याप जाहीर केलेले नाही.
मध्य प्रदेशात काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:37 AM