कें द्रात आमची भूमिका किंगमेकरचीच, टीआरएसचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 05:53 AM2019-03-18T05:53:36+5:302019-03-18T05:54:14+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी एका बाजूला भाजपा तर दुसऱ्या बाजूला अन्य विरोधी पक्ष आहेत.
हैदराबाद - लोकसभा निवडणुकीसाठी एका बाजूला भाजपा तर दुसऱ्या बाजूला अन्य विरोधी पक्ष आहेत. पण, तेलंगणा राष्ट्र समितीसारखे (टीआरएस) प्रादेशिक पक्ष तूर्तास तटस्थ भूमिकेत असून जर सरकार स्थापनेसाठी मोठ्या पक्षाला सहकार्याची गरज लागली तर आपण किंंगमेकरच्या भूमिकेत राहू, असा दावा या पक्षाने केला आहे.
टीआरएसचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, त्यांचे चिरंजीव आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव यांनी स्पष्ट केले आहे की, ते बिगर भाजपा, बिगरकाँग्रेसचे सरकार सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. एनडीएविरुद्ध काँग्रेस, बसपा- सपा, तृणमूल, भाकपा, डीएमकेसारखे विरोधी पक्ष एकत्र आले असताना टीआरएस त्यांच्यापासून दूरच आहे. टीआरएसच्या सूत्रांनी सांगितले की, प्रादेशिक पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर महत्वाची भूमिका पार पाडू शकतात.
टीआरएसच्या एका नेत्याने सांगितले की, पक्षाला असे वाटते की, भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएच केंद्रात सत्ता स्थापन करू शकते. जर भाजपाने बहुमत मिळवून सरकार स्थापन केले तर ठीक आहे. अन्यथा, टीआरएस कें द्रात सरकार स्थापन करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडेल. (वृत्तसंस्था)
१४ जागा पक्क्या?
तेलंगणात अलीकडेच विधानसभा निवडणुका झाल्या. टीआरएसला असा विश्वास आहे की, लोकसभा निवडणुकीत १४ जागांवर आपल्याला विजय मिळेल.
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या हैदराबाद या मतदारसंघातूनही विजय मिळेल असा दावा पक्ष
करत आहे.