केजरीवालांच्या अटकेविरुद्ध आपचा सामूहिक उपवास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 05:54 AM2024-04-08T05:54:59+5:302024-04-08T05:55:27+5:30
देश-विदेशात केले शक्तिप्रदर्शन; आपला संपविण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली : ‘जेल के ताले तुटेंगे, अरविंद केजरीवाल छुटेंगे,’ अशी घोषणा देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ रविवारी सत्ताधारी आपच्या समर्थकांनी देशभरात तसेच जगभरात अनेक ठिकाणी सामूहिक उपवासाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करीत केंद्रातील सरकारविरुद्ध निषेध आंदोलन छेडले. गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे ईडी, सीबीआय, आयकर विभाग या संस्थांनी भाजपविरुद्ध काहीही पाहणार नाही, ऐकणार नाही आणि बोलणार नसल्याचे ठरवून टाकले आहे, अशी टीका आप नेते जस्मीन शहा यांनी केली.
दिवसभर सामूहिक उपवासाचे आंदोलन करीत आपने केंद्रावरील दबाव कायम ठेवला. गेल्या २१ मार्चपासून तुरुंगात अटकेत असलेले केजरीवाल यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या समर्थकांना रविवारी सामूहिक ठेवण्याचे आवाहन आम आदमी पार्टीने केले होते. या आवाहनांतर्गत आपचे कार्यकर्ते सामूहिक उपवासावर गेले.
भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी उपवास
आम आदमी पार्टी कट्टर बेईमान असून, भ्रष्टांना पाठीशी घालण्यासाठी सामूहिक उपवास करीत असल्याचा आरोप भाजपने केला. भाजपनेही आज दिल्लीचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या नेतृत्वाखाली पालिका बाजारासह ठिकठिकाणी ‘शराब से शीशमहल’ अशा घोषणा देत धरणेे दिले.
कारस्थान का रचले?
ईडीच्या मनी लाँड्रिंग आरोपात तिहार तुरुंगात सहा महिन्यांचा कारावास भोगल्यानंतर जामिनावर सुटलेले संजय सिंह यांनी केंद्र सरकारचा आक्रमक शब्दात समाचार घेतला.
सिसोदिया, संजय सिंह आणि केजरीवाल यांनी घोटाळे केले म्हणून त्यांना अटक करण्यात आली असे भाजप नेते म्हणत होते. पण, आता वस्तुस्थिती समोर येत असून, आपला संपविण्यासाठीच भाजपने हे कारस्थान रचल्याचे स्पष्ट झाले आहे, असा
आरोप दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी केला.
अजित पवार, अशोक चव्हाण, छगन भुजबळ यांच्यावर स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप लावून आता त्यांचाच बचाव करणार्यांचे दुटप्पी व्यक्तिमत्त्व उघड झाले आहे, अशी टीका राय यांनी केली. यावेळी सर्वच नेत्यांनी भाजपच्या हुकूमशाही कारभारावर कोरडे ओढले.