बस्ती - राम मंदिराबाबत केंद्रीय वित्त राज्यमंत्र्यांनी मोठं विधान केलं आहे. आमचं सरकार राम मंदिर बांधू शकत नाही असं केंद्रीय वित्त राज्यमंत्री शिव प्रताप शूक्ला म्हणाले आहेत. नवभारत टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.
बुधवारी शिव प्रताप शूक्ला हे उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यात होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाने कधीही राम मंदिराच्या नावावर निवडणूक लढवली नाही आणि सरकार राम मंदिर बांधू देखील शकत नाही. भगवान राम नेहमी आमच्या सोबत आहेत. कोर्टातून किंवा परस्परांशी करारातून काही निर्णय झाल्यानंतरच राम मंदिर बांधलं जाईल असं ते म्हणाले. जीएसटीच्या निर्णयाचं जोरदार समर्थन त्यांनी यावेळी केलं. जीएसटी लागू होऊन 3 महिने झालेत. हळूहळू देशात बदल होत आहे असं ते म्हणाले.
उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने काही दिवसांपूर्वीच सरयू नदीच्या किना-यावर श्री रामाची 108 फूट उंच भव्य प्रतिमा उभारण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडून अजून यासाठी मंजुरी मिळालेली नाही, मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू केलं जाणार आहे.
यापूर्वी येत्या दिवाळीपर्यंत सर्वोच्च न्यायालयात अयोध्या रामजन्मभूमी वादाबाबत निर्णय येईल, त्यानंतर पुढच्या वर्षी प्रत्यक्ष राममंदिराच्या उभारणीला सुरुवात करणार आहे. कॉंग्रेसचा सर्व आघाड्यांवर पराभव झाल्याने नैराश्यामधून त्यांनी असहिष्णुतेचा मुद्दा हाती घेतला आहे. हा केवळ प्रचार असून त्यामधून काहीही साध्य होणार नाही. घटनेतील कलम 370 रद्द करणार असून त्यासाठी राष्ट्रपतीच्या एका आदेशाची आवश्यकता आहे. आता तर भाजपाचेच राष्ट्रपती आहेत. त्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता नाही, असं भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले होते.