तेलंगणात ओवेसी किंगमेकर?, टीआरएसला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 04:46 AM2018-12-05T04:46:57+5:302018-12-05T04:47:17+5:30

तेलंगणात एमआयएमची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असून, सत्ता स्थापन करण्यात एमआयएमचे नेते असुदुद्दीन ओवेसी किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.

Owaisy Kingmaker in Telangana ?, support for TRS | तेलंगणात ओवेसी किंगमेकर?, टीआरएसला पाठिंबा

तेलंगणात ओवेसी किंगमेकर?, टीआरएसला पाठिंबा

Next

- धनाजी कांबळे

हैदराबाद : तेलंगणात एमआयएमची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असून, सत्ता स्थापन करण्यात एमआयएमचे नेते असुदुद्दीन ओवेसी किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसने टीडीपी, डीजेएस आणि सीपीआयसोबत आघाडी केली असली, तरी टीआरएसला ७४ जागांवर विजय मिळेल, असा दावा ओवेसी यांनी केला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीने केलेल्या विकासामुळेच त्यांना पुन्हा सत्तेत जाण्याची संधी द्या, असे आवाहन ओवेसी प्रत्येक सभेत करत आहेत.
राज्यात मुख्य लढत काँग्रेस आघाडी व टीआरएस अशीच होईल. तरीही यात सरकार स्थापन करताना एमआयएमची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हैदराबादमध्ये मोठी ताकद असलेल्या एमआयएमने गेल्यावेळी ७ जागांवर विजय मिळवला होता. ज्या मतदारसंघांत आमचे उमेदवार रिंगणात आहेत. तिथे आम्ही प्रचार करीतच आहोत. मात्र, ज्या भागात आमचे उमेदवार नाहीत. तिथे काँग्रेस आघाडी आणि भाजपच्या विरोधात टीआरएसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत, असे ओवेसी सांगत आहेत. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेस आणि टीडीपीने विषमतेचे राजकारण केले असून, विकासाच्या नावावर जनतेला केवळ भुलथापा दिल्या आहेत. जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्या तुलनेत केसीआर यांनी मुस्लीम समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या असून, त्यामुळे मुस्लिमांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे, असे ओवेसी यांनी बोलून दाखवले.
आम्ही नेहमी विकासाच्या बाजूचे राजकारण केले आहे. तहीही काँग्रेस नेहमीच आम्हाला आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आली आहे. त्यांचा विरोध केला की, आमच्यावर बी टीम असल्याचा आरोप केला जातो. आम्हाला १९९८ तो २०१२ पर्यंत काँग्रेसची एफ टीम, असे म्हटले जात होते. त्यानंतर आता आम्हाला बी टीम म्हटले जात आहे. आम्ही केलेल्या विकासामुळेच त्यांना आमची दखल घ्यावी लागत आहे, हाच त्याचा अर्थ आहे. येत्या २-३ वर्षांत आम्हीच ए टीम असू, असा दावा ओवेसी यांनी केला.
ठग्ज आॅफ तेलंगणा
केसीआर यांनी स्वत:च्या कुटुंबाचाच फायदा केला असून, सत्ता घरातच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेचा विकास न करता केवळ ठकविण्याचे काम केले आहे. त्यामुळेच केसीआर यांनी स्वत:चा मुलगा, मुलगी, पुतण्या, आणि भाचा यांना सत्तेत वाटा देऊन जनतेला ठकविले आहे. तसेच त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील फसविले आहे, असा आरोप काँग्रेस आघाडी आणि भाजपकडून सातत्याने केला जात आहे. मात्र, त्याबाबत येथील मतदार उघडपणे काहीही बोलायला तयार नाहीत. आमचे म्हणणे काय आहे, ते निवडणूक निकालांतूनच कळेल, असे ते सांगतात.
>टीआरएसला ७४ जागा मिळतील
मी काही भविष्यवेत्ता नाही किंवा माझा त्यावर विश्वास नाही. मात्र, जे वातावरण सध्या सर्वत्र दिसत आहे, त्यावरून टीआरएसला ७४ जागा मिळतील, असे ओवेसी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आम्ही ज्या ८ जागा लढवत आहोत, तिथे आम्हाला निश्चितपणे विजय मिळेल, असेही त्यांनी सांगितले आहे.

Web Title: Owaisy Kingmaker in Telangana ?, support for TRS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.